मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जून २०२४
मुंबई, – विलेपार्ले आणि कांदिवलीतील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी समतानगर आणि विलेपार्ले पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन एका बसचालकास अटक केली तर अपघातानंतर पळून गेलेल्या दुसर्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
पहिला अपघात बुधवारी ५ जूनला दुपारी दोन वाजता विलेपार्ले येथील नेहरु रोड, पेट्रोल पंपाजवळील बसस्टॉपजवळ झाला. सिताराम काळूराम धोत्रे हे विलेपार्ले पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. बुधवारी दुपारी नेहरु रोडवर अपघात झाल्याची माहिती कंट्रोल रुममधून पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी व्यक्तीला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस पथक तिथे गेले होते. तिथे पोलिसांना प्रदाम रघु सिंग या ४१ वर्षांच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले. प्रदाम हा पेट्रोल पंपाजवळील बसस्टॉपजवळून जात होता. यावेळी वरळीहून सिप्झला जाणार्या एका बेस्ट बसने त्याला धडक दिली होती. जखमी झाल्याने त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे सिताराम धोत्रे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बेस्टचा चालक राहुल रामचंद्र कांबळे याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
दुसर्या अपघातात उबैदउल्लाह अनवारुलहक मनिहार या ४० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. उबैदउल्लाह हा भाईंदर येथे राहत असून त्याचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी १ जूनला दुपारी बारा वाजता तो कामानिमित्त कांदिवलीला गेला होता. सायंकाळी चार वाजता तो त्याच्या बाईकवरुन घराच्या दिशेने येत होता. यावेळी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाकूर संकुल गेटसमोर त्याच्या बाईकला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघताानंतर आरोपी चालक पोलिसांना अपघाताची माहिती न देता तसेच जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल न करता पळून गेला होता. त्यामुळे त्याला समतानगर पोलिसांनी कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी त्याच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.