शहरात दोन अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू

अपघाताला जबाबदार असलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 एपिल 2025
मुंबई, – गेल्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. माहीम आणि परळ परिसरात दोन्ही अपघात झाले असून याप्रकरणी माहीम आणि भोईवाडा पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन्ही आरोपी चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. विशेष म्हणजे अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही मृतांची ओळख पटली नसून त्यांची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुर केले आहेत.

पहिला अपघात शनिवारी सकाळी साडेसात वाजता माहीम येथील स्वामी विवेकानंद रोड, माहीम जंक्शन, सेंट मायकल चर्च, मोरी रोड सिग्नलजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेमानंद धोंडू टिकम हे मिरारोड येथे राहत असून माहीम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी त्यांची रात्रपाळी होती. त्यामुळे रात्री आठ वाजता ते पोलीस ठाण्यात हजर झाले होते. रात्री उशिरा ते महिला पोलीस शिपाई आवारे यांच्यासोबत अ‍ॅण्टी चैन स्नॅचिंग पॉईटवर गस्त घालण्यासाठी निघाले होते. सकाळी साडेसात वाजता गस्त घालताना त्यांना सेंट मायकल चर्चसमोरील मोरी सिग्नलजवळ अपघात झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त झाली होती. त्यामुळे ते त्यांच्या सहकार्‍यांसोबत अपघात झालेल्या ठिकाणी रवाना झाले होते.

घटनास्ळी गेल्यानंतर जखमी महिलेला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मृत महिला ही मोरी सिग्नलजवळ बसली होती, यावेळी तेथून जाणार्‍या एका बेस्ट बसने तिला धडक दिली होती. घटनास्थळाहून पोलिसांनी बेस्ट चालक फिरोज पटेल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी प्रेमानंद टिकम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फिरोज पटेल याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तिची ओळख पटली नाही. त्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

दुसरा अपघात शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजता परळ येथील डॉ. बी. ए रोड, डॉ. एफ एच हिल्लु क्लिनिकसमोर झाला. या ठिकाणाहून मृत व्यक्ती रस्त्यावरुन पायी जात होता. यावेळी तेथून जाणार्‍या एका कारने त्याला जोरात धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी व्यक्तीला केईएम हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी भोईवाडा वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई तुळशीराम तुकाराम आगोने यांच्या तक्रारीवरुन भोईवाडा पोलिसांनी जुबीन हिल्लूविरुद्ध अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत जुबीनला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page