दोन वेगवेगळ्या अपघातात वयोवृद्ध महिलेसह दोघांचा मृत्यू

विक्रोळी-मलबार हिल येथील घटना; दोन एडीआरची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑगस्ट 2025
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका वयोवृद्ध महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विक्रोळी आणि मलबार हिल पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. याच गुन्ह्यांत एका बेस्ट चालकास मलबार हिल पोलिसांनी अटक करुन नोटीस देऊन सोडून दिले तर अपघातानंतर पळून दुसर्‍या बाईकस्वाराचा विक्रोळी पोलीस सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध घेत आहेत.

पहिला अपघात मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास मलबार हिल येथील रिझ रोड, आयएन गेटजवळील अस्फोर्ड इमारतीसमोर झाला. याच परिसरात निता नितीन शहा ही 75 वर्षांची वयोवृद्ध महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. निता या नेहमी सकाळी मॉर्निग वॉकसाठी जात होत्या. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी आली होती. सकाळी पावणेनऊ वाजता ती वॉक करुन घरी जात होती. मलबार हिल क्लब येथून तीनबत्तीच्या दिशेने जाताना एक स्कोडा कार नो पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्यामुळे ती रस्त्याच्या आतील बाजूने जात असताना तिला तीनबत्तीकडून पौर्णिमा जंक्शनकडे जाणार्‍या एका बेस्ट बसने जोरात धडक दिली. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी बेस्ट बसचालक अक्षय अविनाश सुर्वे या बेस्ट चालकाविरुद्ध पोलिसांनी हलगजीर्पणाने बस चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला अटक करुन नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

दुसरा अपघात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्ग, कन्नमवारनगर बसस्थानकासमोर झाला. विनोद अंकुश भरपूर हा विक्रोळीतील कन्नमवारनगर दोन, भिमछाया रहिवाशी संघात राहत असून मृत अंकुश एकनाथ भरपूर (42) हे त्याचे वडिल आहेत. रविवारी सायंकाळी अंकुश हे कामावरुन बसने प्रवास करुन कन्नमवारनगर येथून रस्ता क्रॉस करत होते. यावेळी मुंबईकडून ठाण्याकडे जाणार्‍या एका बाईकस्वाराने त्यांना जोरात धडक दिली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता आरोपी बाईकस्वार घटनास्थळाहून पळून गेला होता. जखमी झालेल्या अंकुश यांना तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विनोद भरपूर याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या बाईकस्वाराचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page