मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका सतरा वर्षांच्या कॉलेज तरुणासह 58 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कालिना आणि सायन परिसरात घडली. मृतांमध्ये अब्दुल शब्बीर शेख आणि शकीलाबानू मोहम्मद सलीम अन्सारी यांचा समावेश आहे. याप्रकरणी बीकेसी आणि सायन पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन पळून गेलेल्या दोन्ही आरोपी चालकांचा शोध सुरु केला आहे.
पहिला अपघात गुरुवारी सायंकाळी सव्वाचार वाजता कालिना येथील सांताकु्रज-चेंबूर लिंक रोड, मर्सिडिज बेंझ कार शोरुमजवळ झाला. अब्दुल हा वांद्रे येथील संत ज्ञानेश्वर नगर परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. सध्या तो चेंबूर येथील आचार्य कॉलेजमध्ये विज्ञात शाखेत अकरावीत शिकत होता. गुरुवारी सकाळी अब्दुल हा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघून गेला. सायंकाळी त्याच्या मित्रासोबत बाईकवरुन येताना मर्सिडिज बेंझ कार शोरुमजवळ एका टँकरच्या त्याच्या बाईकला धडक दिली होती. त्यात अब्दुल हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला सांताक्रुज येथील व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सायंकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्याचे वडिल शब्बीर शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात टँकरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने टँकर चालवून एका कॉलेज तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानतर टँकरचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसरा अपघात सायन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, युनियन बँकेसमोरील दक्षिण वाहिनीवरील झेब्रा क्रॉसिंगजवळ झाला. मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम अन्सारी हा भायखळा येथे राहत असून एका खाजगी कंपनीच्या शॉपमध्ये अकाऊंटट म्हणून कामाला आहे. मृत शकीलाबानू ही त्यांची आई आहे. रविवारी दुपारी अडीच वाजता मोहम्मद सलमान हे त्यांची आई शकीलाबानू, तीन वर्षांचा मुलगा अरमान यांच्यासोबत त्यांच्या बाईकवरुन त्यांच्या कुर्ला येथे राहणार्या शायना या बहिणीच्या घरी गेले होते. तिथे काही वेळ थांबल्यानंतर ते तिघेही रात्री त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री साडेआठ वाजता त्यांची बाईक युनियन बँकेसमोरुन जात होती. यावेळी एका बसने त्यांच्या बाईकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोहम्मद सलमानचा बाईकवरील नियंत्रण सुटले.
यावेळी ते त्यांच्या मुलासोबत डाव्या तर त्यांची आई शकीलाबानू ही उजव्या बाजूला पडली. त्यात शकीलबानू यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला तातडीने तातडीने जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करणयात आले होते. तिथे उपचार सुरु असताना रात्री साडेदहा वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी बसचालक अवधूत पाटील याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने बस चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सायन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. चौकशीत अवधूत हा मूळचा कोल्हापूर, कागलच्या सोनगीचा रहिवाशी असून तो बसचालक म्हणून काम करतो. अपघातानंतर त्याला स्थानिक लोकांनी पकडले होते, मात्र नंतर तो पळून गेला होता.