मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 डिसेंबर 2025
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघात दादर आणि चुन्नाभट्टी परिसरात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये मंदार भालचंद्र कोटकर आणि संपदा प्रदीप पाखरे यांचा समावेश आहे. यातील संपदाचा ऑक्टोंबर महिन्यांत साखरपुडा झाला होता, फेब्रुवारी महिन्यांत तिचे लग्न होणार होते, तिच्या अपघाती निधनाने तिच्या भावी पतीला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे बोलले जाते. याप्रकरणी चुन्नाभट्टी आणि माटुंगा पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन अपघातानंतर पळून गेलेल्या चालकांचा शोध सुरु केला आहे.
पहिला अपघात बुधवार रात्री बारा वाजता चुन्नाभट्टी येथील पूर्व दुतग्रती महामार्गावरील प्रियदर्शनी बसस्टॉपजवळील दक्षिण वाहिनीवर झाला. भालचंद्र रमन कोटकर हे 63 वर्षांचे वयोवृद्ध नवी मुंबईतील पनवेल, साईनगरच्या तुलसी सोसायटीमध्ये राहत असून ते सध्या निवृत्त झाले आहेत. त्यांचा मृत मंदार हा मुलगा असून तो एका खाजगी कंपनीच्या जहाजावर कामावर होता. बुधवारी सकाळी नऊ वाजता तो त्याच्या कंपनीच्या कामासाठी फोर्ट येथील कार्यालयात जाण्यासाठी घरातून त्याच्या बाईकवरुन गेला होता. त्याची बाईक चुन्नाभट्टी येथील प्रियदर्शनी बसस्टॉपजवळून जात असताना भरवेगात जाणार्या एका टेम्पोने त्यच्या बाईकला जोरात धडक दिली होती.
अपघातात जखमी झालेल्या मंदारला तातडीने सोमय्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघाताची माहिती मिळताच चुन्नाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. चौकशीदरम्यान अपघातानंतर आरोपी टेम्पोचालक वडाळ्याच्या दिशेने पळून गेला होता. त्याचा टेम्पो क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला होता. या क्रमाकांवर टेम्पोचालकाचे नाव मोतीलाल राजभर असल्याचे उघडकीस आले होते. या अपघतााची माहिती नंतर मंदारच्या पालकांसह नातेवाईकांना देण्यात आली होती.
दुसर्या अपघातात संपदा पाखरे या 29 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला तर तिचा भावी पती निलेश महादेव थोरात हा जखमी झाला. याप्रकरणी नऊ दिवसांनी निलेशच्या तक्रारीरुन माटुंगा पोलिसांनी आरोपी टँकरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने टँकर चालवून एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निलेश थोरात हे लालबाग येथे राहत असून एका खाजगी कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कामाला आहे. त्यांचे संपदा या तरुणीशी लग्न ठरले होते. 26 ऑक्टोंबर 2025 रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता तर 2 फेब्रुवारीला त्यांचे लग्न ठरले होते.
संपदा ही सध्या दादर येथील एका बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम करत होती. नोव्हेंबर महिन्यांत ते दोघेही अकल्लकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. 2 डिसेबरला निलेश हे संपदाला त्यांच्या बाईकवरुन तिच्या दादर येथील बँकेत सोडण्यासाठी जात होते. पावणेदहा वाजता ते दोघेही दादर येथील प्लाझाकडून दादर टीटीकडे जाणार्या टिळक ब्रिजवरुन जात असताना अचानक एका पाण्याच्या टॅकरने त्यांच्या बाईकला धडक दिली. त्यात संपदा ही बाईकवरुन खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली होती. तिला बेशुद्धावस्थेत वाहतूक पोलिसांसह त्यांनी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरु होते.
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. संपदाच्या अपघाती मृत्यूने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते तसेच संपदाच्य अंत्यसंस्कारानंतर अन्य विधीमुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. रुग्णालयातून डिस्वार्ज मिळताच निलेश थोरात यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या दोन्ही अपघातप्रकरणी दोन्ही आरोपी चालकाविरुद्ध पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला आहे.