मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेने सुनिल खंडू पालके या ३९ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनचालकाचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध घेत आहेत.
दिपाली सुनिल पालके ही महिला चेंबूरच्या शीव-ट्रॉम्बे रोड, लालडोंगर, सावित्रीबाई फुले चाळीत राहते. मृत सुनिल हा तिचा पती असून तो प्लंबरचे काम करतो. शनिवारी २८ सप्टेंबरला सुनिल हा नेहमीप्रमाणे त्याच्या कामासाठी घरातून निघून गेला होता. रात्री उशिरा तो जेवणासाठी कामावरुन घरी आला नव्हता. त्यामुळे तिने त्याला कॉल केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. दुसर्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता तिच्या मुलाने कॉल केला असता समोरुन पोलिसांनी कॉल घेतला होता. सुनिलचा अपघात झाला असून त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दिपाली ही तिच्या मुलासोबत हॉस्पिटलमध्ये आली होती. यावेळी तिला तिचा पती रात्री दोन ते सकाळी सहाच्या सुमारास चेंबूरच्या वामनवाडी, छगनमिठा पेट्रोलपंपाजवळ जात होता. यावेळी एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली होती.
अपघाताची माहिती मिळताच चुन्नाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या सुनिलला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी दिपाली पालके हिची जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर वाहनचालक सुनिलला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन वाहनाची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोरेगाव येथे तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू
दुसरा अपघात मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता गोरेगाव येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील गोकुळधाम, श्रीजी रेस्ट्रारंटजवळ परिसरात झाला. रमेश चंद्रकांत मोरे हे मालाड येथील कुरारगाव परिसरात त्यांची पत्नी आणि तेरा वर्षांची मुलगी तन्मयी हिच्यासोबत राहतात. तन्मयी ही गोरेगाव येथील एका खाजगी शाळेत सातवीत शिकत होती. मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता रमेश हे नेहमीप्रमाणे त्यांच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी त्यांच्या बाईकवरुन जात होते. ही बाईक गोकुळधाम, श्रीजी रेस्ट्रारंटजवळ येताच एका भरवेगात जाणार्या डंपर चालकाने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. त्यात तन्मयी ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघाताची माहिती मिळताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना काही तासांत आरोपी डंपरचालक प्रशांत संजय गुप्ता (२३) याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.