मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2025
मुंबई, – दादर आणि साकिनाका येथील दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ढगलसिंग भजेसिंग राजपूत या 64 वर्षांच्या वयोवृद्धाचा समावेश असून दुसर्या मृत व्यक्तीची ओळख पटली नाही. त्याची ओळख पटावी यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क आणि साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन एका बाईकस्वाराला अटक केली आहे.
पहिला अपघात रविवारी रात्री आठ वाजता दादर येथील सेनापती बापट मार्ग, पंढरी चहा हॉटेलसमोर झाला. गुड्डू जालंदर गौड हे नालासोपारा येथे राहत असून त्यांचा दादर येथील सेनापती बापट मार्गावरील एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे. रविवारी रात्री आठ वाजता दुकान बंद झाल्यानंतर ते ढगलसिंग यांच्यासोबत दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी चालत जात होते. पंढरी हॉटेलसमोर रस्ता क्रॉस करताना सेनापती बापट मार्गावरुन माहीमच्या दिशेने जाणार्या एका बाईकस्वाराने ढगलसिंग यांना जोरात धडक दिली होती. या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे बाईकस्वारासह गुड्डू गौड यांनी जखमी झालेल्या ढगलसिंग यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रात्री बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुड्डू गौड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बाईकस्वार रितिकेश उटेकर याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसरा अपघात शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजता साकिनाका येथील काजूपाडा, पेनिनसूला हॉटेलजवळ झाला. मोहम्मद उस्मान अहमद हुसैन चौधरी हा तरुण साकिनाका येथे राहत असून एका खाजगी कंपनीत ऑफिसबॉय म्हणून काम करतो. शुक्रवारी पाच वाजता तो चहा पिण्यासाठी गेला होता. यावेळी पेनिनसुला हॉटेलच्या दिशेने जाणार्या एका महिंद्रा बोलेरो पिक वाहनाने एका पादचार्याला धडक दिली होती. त्यात गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. अपघातानंतर साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद उस्मानच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी वाहनचालक हाफिज सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.