मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2025
मुंबई, – मुलुंड आणि शिवडी येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. शिवगुलाम श्रीराम कुर्मी आणि संजय कुमार छेदीलाल अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मुलुंड आणि शिवडी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. याच गुन्ह्यांत रामसुंदर खुला अहिरवाल या आरोपी ट्रकचालकास मुलुंड पोलिसांनी अटक केली तर अपघातानंतर पळून गेलेल्या दुसर्या गुन्ह्यांतील चालकाचा शिवडी पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिला अपघात रविवारी सकाळी सहा वाजताशिवडी येथील कोलडेपो, राहुल हार्डवेअर, चिआसो ग्लास गोदामासमोर झाला. याच परिसरात रामशंकर श्रीराम कुर्मी हा राहत असून तो कडीया काम करतो. मृत शिवगुलाम हा त्याचा लहान भाऊ असून त्याला कडिया कामाला मदत करतो. रविवारी सकाळी सहा वाजता शिवगुलाम हा घराबाहेरच असलेल्या बाथरुमला गेला होता. बाथरुममधून घराच्या दिशेने जात असताना त्याला एका भरवेगात जाणार्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली होती. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला स्थानिक रहिवाशांनी जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शिवगुलाम कुर्मी याच्या जबानीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसरा अपघात रविवारी दुपारी एक वाजता मुलुंड येथील पंडित मदनमोहन मालविया रोड, रत्नापार्कसमोरील संत नरहरी चौकात झाला. दिवाकर मुद्दू दिवाडिगा हा मुलुंडच्या किर्ती महल हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. याच हॉटेलमध्ये मृत संजय हा डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला होता. रविवारी दुपारी तीन वाजता तो सायकलवरुन डिलीव्हरीचे पार्सल देण्यासाठी गेला होता. संत नरहरी चौक परिसरातून जात असताना एका भरवेगात जाणार्या ट्रकने त्याच्या सायकलला जोरात धडक दिली होती. त्यात संजय हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या संजयला जवळच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातआले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी दिवाकर दिवाडिगा यांच्या तक्रारीवरुन मुलुंड पोलिसांनी ट्रकचालक रामसुंदर अहिरवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. रामसुंदर हा कळवा येथील टीएमसी शाळेजवळील खारेगाव, पाटीलवाडीचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.