शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक

तीन देशी पिस्तूलसह पाच काडतसांचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 जानेवारी 2026
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या दोघांना सांताकु्रज आणि गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. विजय नारायण ढोकरकर आणि अमोल राजू पटेल अशी या दोघांची नावे आहेत. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूलसह पाच जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे. या दोघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर राज्यातून घातक शस्त्रांची विक्री करणार्‍या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना अंधेरी आणि सांताक्रुज परिसरात काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेसह सांताक्रुज पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी अंधेरीतील गोखले ब्रिजजवळील जलअभियंताजवळ साध्या वेशात पाळत ठेवी होती. शनिवारी सायंकाळी तिथे अमोल पटेल हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतुसे सापडले. तपासात अमोल हा दहिसर येथील गणपत पाटील नगर, आयसी कॉलनी, गणेशनगर परिसरात राहत असून तो तिथे घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होता. मात्र या शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी पोलिसांनी अटक केली.

ही कारवाई ताजी असताना रविवारी सांताक्रुज पोलिसांच्या एका विशेष पथकाने सांताक्रुज येथील रिलीफ रोड, एसएनडीटी कॉलेजवळ पाळत ठेवून विजय ढोकरकर याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत. विजय हा विलेपार्ले येथे राहत असून काहीच कामधंदा करत नव्हता. घातक शस्त्रांच्या विक्रीतून त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळणार होती. या दोघांविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना वांद्रे आणि किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page