जोगेश्वरी-साकिनाका येथे दोन बंधूंसह तिघांवर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या दोन गुन्ह्यांत सहाजणांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2025
मुंबई, – फटाके फोडण्यासह इफ्तारीचे फळ कापण्यावरुन झालेल्या वादातून दोन बंधूंसह तिघांवर दोन गटाने प्राणघातक हल्ला केला. त्यात कैफ रहिम शेख, संतोष सुखराम प्रजापती आणि अजय सुखराम प्रजापती असे तीनजण जखमी झाले. यातील कैफवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत तर दोन्ही बंधूंना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी ओशिवरा आणि साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांची नोंद करुन सहाजणांना अटक केली आहे. अटकेनंतर या सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तीनजण पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
शानू मिराज खान हे कुर्ला येथील काजूपाडा परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे जोगेश्वरीतील वैशालीनगरात शानू किड्स हब नावाचे एक कपडयाचे दुकान आहे. याच दुकानात मृत कफ आणि आरोपी जफर हे दोघेही सेल्समन म्हणून कामाला होते. रविवारी सायंकाळी ते दोघेही नेहमीप्रमाणे कामावर आले होते. सायंकाळी सहा वाजता इफ्तारीचे फळ कापण्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी कैफने जफरच्या कानशिलात लगावली होती. त्याचा जफरच्या मनात राग होता. सायंकाळी सात वाजता याच रागातून जफरसह त्याचे तीन मित्र कैफ, रशीद आणि अयान यांनी कैफ शेख याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पोटात गंभीर दुखापत झाल्याने कैफला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शानू खान यांच्या जबानीवरुन पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना जोगेश्वरीतील वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. जफर फिरोज खान, कैफ रहिस चौधरी, रशीद आझादअली शेख आणि अयान अब्दुल कादिर खान अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर त्यांना सोमवारी दुपारी वांद्रे येथील हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसर्या गुन्ह्यांत फटाके फोडण्यावरुन दोन बंधूंवर पाचजणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संतोष सुखराम प्रजापती आणि अजय सुखराम प्रजापती हे दोघेही जखमी झाले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद होताच हाकीम मुल्लाह मती मुल्लाह आणि इम्रान वाहिद ऊर्फ काल्या या दोघांना पोलिसांनी अटक केली तर बाबूला ऊर्फ समीर ऊर्फ अब्दुल हकीम, सलमान आणि मुन्ना या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. समीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ही घटना रविवारी 30 मार्चला सायंकाळी साडेसात वाजता साकिनाका येथील नेताजीनगर, भारत वुडण पॅकर्स आदर्श सोसायटीजवळ घडली. जखमी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. रविवारी सायंकाळी आरोपी परिसरात फटाके फोडत होते. यावेळी बाबलाने संतोषच्या दिशेने फटाके टाकले होते. त्याचा जाब विचारला म्हणून या पाचजणांनी संतोषसह त्याचा भाऊ अजय यांच्यावर काठीसह लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या तिघांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.