दोन वेगवेगळ्या घटनेत सफाई कर्मचार्‍यासह दोघांवर हल्ला

नेहरुनगर-घाटकोपर पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – कामावरुन तसेच बाईक पार्किंग झालेल्या वादातून एका सफाई कर्मचार्‍यासह दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कुर्ला आणि घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेहरुनगर आणि घाटकोपर पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. यातील एका गुन्ह्यांत अनिल मुथ्यूस्वामी देवेंद्र याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली तर दुसर्‍या अरविंद बारसंगीया, गोविंद बारसंगीया आणि रियाज या तिघांचा नेहरुनगर पोलिसांकडून शोध सुरु आहे.

सरवन राजू देवेंद्र हा मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड परिसरात राहत असून तो सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. मंगळवारी सकाळी अकरा वाजता तो कुर्ला येथील शिवसृष्टी पोलीस चौकीजवळील बीएमसी कार्यालयाजवळील कामगारांच्या रुममध्ये आराम करत होता. यावेळी त्याचा सहकारी परिचित कामगार अनिल देवेंद्र तिथे आला. काही कळण्यापूर्वीच त्याने सरवनवर तिक्ष्ण हत्याराने पोटात आणि छातीत भोसकले होते. त्यात सरवन हा गंभीररीत्या जखमी झाला होता.

हल्ल्यानंतर अनिल हा तेथून पळून गेला. हा प्रकार इतर कर्मचार्‍याच्या लक्षात येताच त्यांनी जखमी झालेल्या सरवनला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या घटनेची माहिती मिळताच नेहरुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सरवरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अनिल देवेंद्रविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. चौकशीत अनिलने सरवरची साहेबांकडे काम करत नसल्याची तक्रार केली होती. त्याचा त्याच्या मनात राग होता. त्यातून त्याने सरवरवर तिक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याचे उघडकीस आले.

दुसरी घटना रविवारी रात्री अकरा वाजता घाटकेापर येथील असल्फा व्हिलेज, साईनाथवाडी भारत गॅससमोर घडली. कुणाल चंद्रकांत अतकर हा पवई येथे राहत असून त्याचे घाटकोपर येथे एक दुकान आहे. रविवारी रात्री त्याच्या दुकानासमोर एका तरुणाने बाईक पार्क केली होती. ही बाईक त्याच्यासह त्याचा मित्र अनिल भंडारीने रियाजच्या दुकानासमोर पार्क केली होती. त्याचा राग आल्याने रियाजसह इतर दोघांनी अनिलला शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहण केली. यावेळी कुणाल अतकर यांनी त्यांच्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने अनिलवर डोक्यात बिअरच्या बाटली, लोखंडी रॉड आणि तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात अनिल हा गंभीरररीत्या जखमी झाला होता. काही वेळानंतर ते तिघेही तेथून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या अनिलला नंतर राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले होते. याप्रकरणी कुणाल अतकरच्या जबानीवरुन पोलिसांनी अरविंद बारसंगीया, गोविंद बारसंगीया आणि रियाज यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page