गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेसह दोघांची फसवणुक
फसवणुकीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांत तिघांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – बिटकॉईनसह खाजगी कंपनीतील गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीसह नर्सची 16 लाख 82 हजाराची फसवणुक झाली. या दोन्ही घटना लालबाग आणि सांताक्रुज परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी काळाचौकी आणि सांताक्रुज पोलिसांनी तिघांविरुद्ध दोन स्वतंत्र फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत कुर्ला येथे राहत असून गेल्या सहा महिन्यांपासून ते त्यांच्या सासरी राहत आहे. ते एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या एका परिचित मित्राने त्यांना बीटकॉईनमध्ये गुंतवणुक केल्याचे सांगून त्यात त्याला चांगला फायदा होत असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने त्यांना बीटकॉईनमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत त्याच्या मित्राचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याशी संभाषण केले होते. सविस्तर चर्चेनंतर त्यांनी बीटकॉईनमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्याने दिलेल्या एका वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी काही ठराविक रक्कमेची गुंतवणुक केली. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ही रक्कम काढण्यासाठी त्यांना ट्रान्स्फर फी भरण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ती रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर त्यांना गोल्ड किंवा सिल्व्हर प्लॅन घेण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यासाठी त्यांनी आणखीन पैसे गुंतवले होते. अशा प्रकारे स्वतचे पैसे बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांच्याकडून 8 लाख 32 हजार रुपये घेण्यात आले होते, मात्र त्यांना मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम मिळाली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या घटनेत योगेश मोहन तोरडमल आणि मनिषा सागर हडके या बहिण भावाविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रिया सागर चव्हाण ही महिला लालबाग येथे राहत असून काही वर्षांपूर्वी ती चर्नीरोडच्या सैफी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. तिथे मनिषा हडके ही सिनिअर नर्स म्हणून कामाला होती. तिची मैत्रिण नयना तोडकर हिने तिला मनिषाचा भाऊ योगेशची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळत असल्याचे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून प्रियाने योगेशच्या कंपनीत दहा लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत तिला मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम मिळाली होती. याबाबत विचारणा केली असता त्यांनी तिला दहा लाखांचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यानंतर त्यांनी तिला दिड लाख रुपये परत करुन उर्वरित रक्कम लवकरच देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी ते आश्वासन पाळले नाही. या दोघांकडून पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने तिने काळाचौकी पोलिसांत त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिा केल्यानंतर योगेश आणि मनिषा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.