मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 मे 2025
मुंबई, – ड्रग्ज तस्करीच्या दोन गुन्ह्यांत चार आरोपींना गुन्हे शाखेसह खेरवाडी पोलिसांनी अटक केली. त्यात एका नायजेरीयन नागरिकाचा समावेश आहे. या चारही आरोपींकडून पोलिसांनी 4 कोटी 32 लाखांचा एमडीसह कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना जोगेश्वरी येथे काही आरोपी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट पाचच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बेंडाळे, न्यायनिर्गुणे, पोलीस हवालदार तानाजी पाटील, अविनाश चिलप, इक्बाल सिंग, वायंगणकर, पोलीस शिपाई पाटील, मुलानी, काळे, सावंत, कांबळे, बागल यांनी जोगेश्वरीतील एस. व्ही रोड, जोगेश्वरी बसस्टॉपजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.
गुरुवारी रात्री साडेआठ वाजता तिथे दोन तरुण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दोन किलो एमडी ड्रग्जचा साठा सापडला. या एमडी ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे. त्यानंतर या दोघांनाही गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई ताजी असताना खेरवाडी पोलिसांनी कोकेनसह दोन आरोपींना अटक केली. जुनैद नईम खान आणि ओलनरेवाजू जोवीता इमुओबू अशी या दोघांची नावे असून यातील ओलनरेवाजू हा नायजेरीयन नागरिक आहे. या दोघांकडून पोलिसांनी 82 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून त्याची किंमत 32 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. जुनैद हा गुरुवारी एमआयजी क्लबजवळ कोकेन विक्रीसाठी आला होता, यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने ओलनरेवाजू याचे नाव सांगितले. त्याच्या चौकशीनंतर वांद्रे येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांच्या पथकातील महिला पोलीस निरीक्षक वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काते, भिसे, पोलीस उपनिरीक्षक लोंढे, सचिन पाटील, प्रियांका चव्हाण, पोलीस हवालदार ठोंबरे, मोरे, सावंत, पोलीस शिपाई यादव, सरवदे, ठाकरे यांनी केली.