कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणुक
गुगल सेवा पुरविण्यासह फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने अनेकांना गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – अंधेरीसह कांदिवलीतील दोन बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून भारतीयासह विदेशी नागरिकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट दहा आणि अकराच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी १९ आरोपींना अटक केली असून त्यात कॉल सेंटरच्या दोन मालकासह पाच टिम लीडर, एक कॉल सेंटरचा मॅनेजर, अकरा ऑपरेटरचा समावेश आहे. ही टोळी गुगल सेवा पुरविण्यासह फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे बोलले जाते.
मुंबई शहरात काही बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून भारतीयासह विदेशी नागरिकांची फसवणुक होत असल्याच्या काही तक्रारी गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्यामुळे अशा बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. यापूर्वीही काही बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली होती. ही कारवाई सुरु असताना अंधेरी आणि कांदिवली परिसरातील काही बोगस कॉल सेंटरमधून अनेकांची फसवणुक होत असल्याची माहिती युनिट दहा आणि अकराच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर युनिट दहाच्या अधिकार्यांनी अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, जे. बी नगर, चकाला, ट्रेड स्टार इमारतीच्या सी विंगच्या आठव्या मजल्यावरील ऍक्सेन्ट्यूटऍट ग्लोबल टेक्नॉलॉजिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या बोगस कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. या ठिकाणी कॉल सेंटरद्वारे विदेशी नागरिकांना बोगस नाव धारण करुन ते गुगल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून, त्यांचे गुगलवर असलेले बिझनेस प्रोफाईल बंद होणार आहे. ते अपडेट करुन देतो, ग्रीन टिक व्हेरीफाईड करुन देतो असे सांगून विदेशी नागरिकांकडून क्रेडिट कार्डवरुन शंभर ते दोनशे डॉलर स्विकारुन गुगलची कोणतीही सेवा न पुरविता फसवणुक करत होते.
ही कारवाई ताजी असतानाच युनिट अकराच्या अधिकार्यांनी कांदिवलीतील वसनजी लालजी रोड, अविराही आर्केडच्या दुसर्या मजल्यावरील स्पॉट फिक्सीत सोल्यूशन या कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. या ठिकाणी एक बोगस कॉल सेंटर सुरु होता. काहीजण त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसताना, भारतीय रिझर्व्ह बँकेने फॉरैक्स ट्रेडिंग करण्यावर बंदी घातली असताना भारतीय नागरिकांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करत होते. त्यांना गुंतवणुकीवर चांगला परवाता देतो असे सांगून त्यांच्याकडून ऑनलाईन पेमेंट घेऊन त्यांची फसवुणक करत होते. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी दोन्ही कॉल सेंटरचे दोन मालक, पाच टिम लीडर, एक मॅनेजर, अकरा ऑपरेटर अशा एकोणीसजणांना अटक केली. घटनास्थळाहून बारा मोबाईल फोन, बावीस हार्डडिस्क, एक मॉनिटर, दोन सीपीयु, एक राऊटर, एक लॅपटॉप, एक किबोर्ड, बारा हेडफोन माईक तसेच इतर महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत केले आहेत. विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केल्यानंतर या सर्वांना शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. या टोळीने आतापर्यंत अनेक भारतीयांसह विदेशी नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे दहाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, रोहित नार्वेकर, अफरोज शेख, पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार कांबळे, पोलीस हवालदार धारगळकर, माने, खरात, मोरे, चवरे, चिकणे, पोलीस शिपाई डफळे, निर्मळे, महिला पोलीस शिपाई सोनावणे, पोलीस शिपाई चालक झरेकर, शिंदे, तसेच युनिट अकराचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सावंत, पोलीस हवालदार देशमुख, सुर्वे, केणी, खांडेकर, खताते, कदम, सावंत, महिला पोलीस हवालदार लाडे, कदम, महिला पोलीस शिपाई गोसावी, सहाय्यक फौजदार ढगे यांनी केली.