मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2025
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील सातजणांच्या एका टोळीला वडाळा टी टी आणि डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. नजीमुल हक इसाक शेख, अरबाजअली मोहसीन मलिक, नागेश नित्या देवेंद्र, सत्या रविचंद्र देवेंद्र आणि अंकित महेश गुप्ता, दिपक लोकेश भूमी आणि मनोज कृष्णा गावडे अशी या सातजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांत वडाळा परिसरात रात्रीच्या वेळेस घरफोडीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. अलीकडेच पाच वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची पोलिसांकडून नोंद करण्यात आली होती. रात्रीच्या वेळेस होणार्या घरफोडीच्या घटनेची अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी गंभीर दखल घेत वडाळा टी टी पोलिसांना आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश जाधव, पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माधवेंद्र भोसले, पोलीस हवालदार संपत गोसावी, रविंद्र ठाकूर, रमेश कुटे, पोलीस शिपाई विजय हनुमंते, नबीलाल बोरगावकर, शफीक शेख आाणि रमेश बोरसे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून पाच आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
यातील नजीमुल शेखच्या चौकशीतून दोन घरफोडीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा एक लाख सहा हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी असून गुन्ह्यांत त्याला इतर काही मित्रांनी मदत केली होती. ते पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध चारहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. अन्य एक आरोपी अरबाजकडून पोलिसांनी 4 लाख 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने 6 लाख 69 लाखांची घरफोडीची कबुली दिली होती. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे चार गुन्हे दाखल आहेत. तिसर्या गुन्ह्यांत तीन आरोपी नागेश, सत्या आणि अंकित यांच्याकडून पोलिसांनी पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांविरुद्ध आठ ते दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ऑपेरा हाऊसमधील एका शॉपमध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी दिपक आणि मनोज या दोघांना डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेने एमआरए मार्ग, गावदेवी, गावदेवी, भोईवाडा आणि डी. बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच घरफोडीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे, पोलीस उपनिरीक्षक गौरव तंवर व गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.