मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑगस्ट 2025
मुंबई, – गोवंडी येथे एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच क्रिकेट कोच तर चुन्नाभट्टी येथे दहा वर्षांच्या पुतणीवर तिच्याच साठ वर्षांच्या वयोवृद्ध चुलत्याने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवनार आणि चुन्नाभट्टी पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन आरोपी क्रिकेट कोचसह वयोवृद्ध चुलत्याला अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी घाअकोपर येथे राहत असून ती गोवंडीतील एका क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेट प्रशिक्षणासाठी जात होती. तिथे 37 वर्षांचा आरोपी तिचा क्रिकेट कोच म्हणून काम करत होता. मे ते ऑगस्ट 2025 या कालावधीत त्याने पिडीत मुलीशी अनेकदा जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र तो सतत तिच्याशी लैगिंक चाळे करत असल्याने तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी देवनार पोलिसांत तक्रार केली होती. या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी क्रिकेट कोचविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सोमवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. दोन वर्षापूर्वी आरोपी क्रिकेट कोचविरुद्ध देवनार पोलिसांनी विनयभंगासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध आता दुसर्या लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी घटना चुन्नाभट्टी परिसरात घडली. या गुन्ह्यांतील पिडीत दहा वर्षांची मुलगी चुन्नाभट्टी येथे राहत असून साठ वर्षांचा वयोवृद्ध आरोपी तिचा काका आहे. आरोपी हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून मुंबईत साफसफाईचे काम करतो. रविवारी रात्री उशिरा ही मुलगी तिच्या घरी झोपली होती. यावेळी आरोपीशी तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील चाळे केले होते. त्यानंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार पिडीत मुलीकडून तक्रारदार तरुणीला समजताच तिने चुन्नाभट्टी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री आरोपी चुलत्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.