नागरकोईल एक्सप्रेससह पादचारी पुलावर दोन महिलांचा विनयभंग
दोन्ही आरोपींना अटक; सीएसएमटी व कुर्ला रेल्वे पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मे २०२४
मुंबई, – पुण्याहून मुंबईत येताना नागरकोईल एक्सप्रेससह विद्याविहार रेल्वेच्या पादचारी पुलावर दोन महिलांचा विनयभंग झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद होताच दोन्ही आरोपींना अटक केली आहे. निखिल अनिल जगताप आणि रमेश डांगे अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यातील पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला तिच्या दोन मैत्रिणीसोबत रविवारी पुण्याहून मुंबईला येणार्या नागरकोईल एक्सप्रेसने प्रवास करत होती. ही एक्सप्रेस सायंकाळी सव्वापाच वाजता लोणावळा रेल्वे स्थानकात आली होती. तिथे निखिल जगताप एक्सप्रेस चढला होता. त्याने मद्यप्राशन केले होते. ठाणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्याने तक्रारदार महिलेच्या दोन्ही मैत्रिणींना हात लावू का अशी विचारणा करुन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे तिने १३९ क्रमांकावर संपर्क साधून रेल्वे पोलिसांची मदत मागितली होती. सायंकाळी पावणेआठ वाजता ही एक्सप्रेस सीएसएमटी रेल्वे स्थानकात आली. यावेळी त्या तिघीही एक्सप्रेसमधून खाली उतरत असताना त्याने एका महिलेच्या गालावर हात वला. हा प्रकार तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी निखील जगतापला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर या तिन्ही महिलांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर निखिलविरुद्ध पोलिसांनी ३५४, ५०९ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर घडली. २५ वर्षांची तक्रारदार तरुणी ही विक्रोळी येथे राहत असून विद्याविहार येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. रविवारी सायंकाळी ती विद्याविहार येथील पादचारी पुलावरुन जात होती. यावेळी मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे तिने गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३५४, ३५४ (अ), (आय), (१) गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. रमेश डांगे असे या आरोपीचे नाव असल्याचे उघडकीस आले. या दोन्ही अटक केलेल्या आरोपींना नंतर लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.