आठ व चौदा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
दादर-नागपाड्यातील घटना; वयोवृद्धासह दोघांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – आठ आणि चौदा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याप्रकरणी एका वयोवृद्धासह दोघांविरुद्ध शिवाजी पार्क आणि नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत ४५ वर्षांच्या फेरीवाल्याला नागपाडा पोलिसांनी अटक केली तर वयोवृद्ध शॉपचालकाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
४७ वर्षांची तक्रारदार महिला वांद्रे येथे राहत असून तिचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजता ती तिच्या मुलांसोबत दादर येथे आली होती. यावेळी तिचे दोन मुलीसह मुलगा सॉक्स खरेदी करत होते. काही वेळानंतर तिची चौदा वर्षांची मुलगी एका दुकानासमोर उभी होती. याच दरम्यान शॉपचा चालक असलेल्या एका ६१ वर्षांच्या चालकाने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या आईला सांगितल्यानंतर तिने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात शॉपचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी वयोवृद्ध शॉपचालकाविरुद्ध ७५ भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दुसरी घटना नागपाडा परिसरात घडली. तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत नागपाड्यातील कामाठीपुरा परिसरात राहते. तिला आठ वर्षांची मुलगी आहे. मंगळवारी रात्री त्यांच्याकडे फेरीवाला म्हणून कानातले विक्री करणारा जुबेर अहमद शाह आला होता. त्याच्याकडील कानातले पाहत असताना त्याने तिच्या आठ वर्षांच्या मुलीच्या प्राव्हेट पार्टला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पळून जाणार्या जुबेर शाहला पकडून नागपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने जुबेरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.