मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – साखर देण्यासाठी गेलेल्या एका अकरा वर्षांच्या मुलीचा तिच्याच परिचित ७४ वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घडली. याप्रकरणी बळीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी वयोवृद्धाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.
३० वर्षांची तक्रारदार महिला ही गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला अकरा वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. मंगळवारी २२ ऑक्टोंबरला रात्री आठ वाजता ही महिला मार्केटमध्ये सामान आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिच्या घराच्या पहिल्या मजल्यावर राहणार्या वयोवृद्ध आरोपीने तिच्या मुलीला साखर आणण्यास सांगितले होते. त्यामुळे ती साखर घेऊन पहिल्या मजल्यावर गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने तिचा हात पकडून दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तिच्या शरीरावर नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिच्या घरी निघून गेली. मार्केटमधून तिची आई घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. मुलीकडून हा प्रकार समजताच तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ७४ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.
विक्रोळीत सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग
विक्रोळी येथील अन्य एका घटनेत सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २९ वर्षांच्या आरोपी तरुणाविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. बळीत मुलगी विक्रोळी येथे राहते. आरोपी याच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजता त्याने बळीत मुलीला परिसरातील एका गल्लीत आणून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या आईला सांगितल्यानतर तिने विक्रोळी पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. ही माहिती समजताच आरोपी परिसरातून पळून गेला. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.