मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – भरस्त्यात एका तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर अन्वर नुरैन शेख या २९ वर्षीय आरोपीला स्थानिक लोकांकडून पकडून सांताक्रुज पोलिसांना स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१३ वर्षांची ही मुलगी सांताक्रुज येथे राहत असून याच परिसरातील एका खाजगी शाळेत शिकते. सोमवारी सायंकाळी सात वाजता ती तिच्या घरातून तिच्या मैत्रिणीच्या घरी अभ्यास करण्यासाठी जात होती. सांताक्रुजच्या एका डेअरी दुकानासमोरुन जाताना तिथे अन्वर आला. त्याने तिचा पाठलाग करुन तिच्या पायाच्या पोटर्याला जोरात चिमटा काढला. तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तिने त्याला जाब विचारला असता तिथे जमा झालेल्या लोकांनी अन्वरला पकडले. या मुलीकडून हा प्रकार समजताच या लोकांनी त्याला चांगलाच चोप देत सांताक्रुज पोलिसांच्या स्वाधीन केले. या मुलीच्या जबानीनंतर पोलिसांनी अन्वरविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. भरस्त्यात घडलेल्या या प्रकाराने लोकांमध्ये प्रचंड संताप होता.
अश्लील व्हिडीओ दाखवून सावत्र मुलीचा विनयभंग
अन्य एका घटनेत सोळा वर्षांच्या मुलीचा तिच्याच सावत्र पित्याने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३४ वर्षांच्या आरोपी पित्याविरुद्ध भांडुप पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्याकडून त्याच्या सावत्र मुलीचा मानसिक शोषण सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बळीत मुलगी ही भांडुप येथे राहत असून आरोपी तिचा सावत्र पिता आहे. गेल्या वर्षी जून महिन्यांत घरात कोणीही नसताना त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तो तिला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा सतत मानसिक शोषण करत होता. तिच्या छातीवर अश्लील स्पर्श करुन शारीरिक सुखाची मागणी करत होता. या छळाला कंटाळून तिने हा प्रकार भांडुप पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात आरोपीविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात चारहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर पोलिसांनी ११० (ई), (जी) कलमांतर्गत कारवाई केली आहे.