मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – चेंबूर आणि घाटकोपर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत तेरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा त्यांच्याच परिचित व्यक्तींनी अश्लील चाळे तसेच संभाषण करुन विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी घाटकोपर आणि नेहरुनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील एका गुन्ह्यांतील ३७ वर्षांच्या बेकरीचालकास घाटकोपर पोलिसांनी अटक केली तर दुसरा आरोपी पळून गेला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
घाटकोपर येथे राहणार्या तक्रारदार महिलेला तेरा वर्षांची मुलगी आहे. रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता तिची मुलगी असल्फाच्या दिशेने जात होती. यावेळी याच परिसरातील ३७ वर्षांच्या एका बेकरीचालकाने तिचा पाठलाग केला होता. काही अंतर गेल्यानंतर त्याने तिच्या पार्श्व भागासह छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. घराच्या दिशेने जाताना तो तिचा घरापर्यंत पाठलाग करत होता. त्यानंतर तो पळून गेला. घरी आल्यानंतर तिने तिच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी घाटकोपर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी बेकरीचालकाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना चेंबूर परिसरात घडली. तेरा वर्षांची बळीत मुलगी ही तिच्या पालकांसोबत चेंबूर येथे राहते. मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता ती घराच्या दिशेने जात होती. चालताना तिचा शाळेचा शूज फाटला होता. त्यामुळे ती जवळच असलेल्या तिच्या परिचित चप्पल बनविणार्या व्यक्तीकडे गेली होती. यावेळी या व्यक्तीने तिच्याशी अश्लील संभाषण करुन लगट करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार कोणालाही सांगितला तर त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. घरी आल्यानंतर मुलीकडून हा प्रकार समजताच तिच्या आईने नेहरुनगर पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह धमकी देणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.