शहरात दोन घटनेत चार व सोळा वर्षांच्या मुलींचा विनयभंग
वॉर्डबॉयला अटक तर २७ वर्षांच्या रिक्षाचालकाचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत चार आणि सोळा वर्षांच्या दोन मुलींचा त्यांच्याच परिचित व्यक्तीकडून विनयभंग झाल्याची घटना मालाड आणि बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकणी मालवणी व एमएचबी पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. याच गुन्ह्यांत ४७ वर्षांच्या एका वॉर्डबॉयला मालवणी पोलिसांनी अटक केली तर २७ वर्षांच्या रिक्षाचालकाचा एमएचबी पोलीस शोध घेत आहेत.
२६ वर्षांची तक्रारदार महिला ही गृहिणी असून ती तिच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहते. बळीत तिची चार वर्षांची असून याच परिसरात वॉर्डबॉय म्हणून काम करणारा आरोपी समीर राहतो. त्यामुळे ते एकमेकांच्या परिचित आहेत. रविवारी ८ डिसेंबरला रात्री दहा वाजता ही मुलगी तिच्या मामेबहिणीसोबत घरासमोरच खेळत होती. याच दरम्यान तक्रारदार महिलेचा भाऊ तिच्या घरी येत होता. यावेळी त्याला आरोपी बळीत मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत असल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्याने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, यावेळी आरोपी तेथून पळून गेला होता. घडलेला प्रकार त्याने त्याच्या बहिणीला सांगितला. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र नंतर त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी तिने घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी समीरला पोलिसांनी अटक केली. तपासात तो वॉर्डबॉय म्हणून काम असल्याचे तपासात उघडकीस आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
दुसर्या घटनेत एका सोळा वर्षांच्या शाळकरी मुलीचा तिच्याच परिचित २७ वर्षांच्या रिक्षाचालक तरुणाने विनयभंग केल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. ही मुलगी बोरिवली परिसरात राहत असून याच परिसरातील एका शाळेत शिकते. ९ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता ती शाळेत जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. यावेळी तिथे अवधेश आला आणि त्याने तिला जबदस्तीने त्याच्या रिक्षात बसवून बोरिवली रेल्वे स्थानकात आले. तिच्याशी अश्लील संभाषण सुरु केले. रिक्षातच त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली होती. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. नंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी अवधेशविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अवधेशविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.