मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जून २०२४
मुंबई, – अश्लील चाळे करुन सात आणि आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार कांदिवलीसह काळाचौकी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली आणि काळाचौकी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. याच गुन्ह्यांत दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
३० वर्षांची तक्रारदार महिला ही कांदिवली येथे राहत असून तिला सात वर्षांची मुलगी आहे. गेल्या आठवड्यात ही मुलगी तिच्या लहान मित्रांसोबत घरासमोरच खेळत होती. यावेळी त्याच परिसरात राहणार्या ४५ वर्षांच्या आरोपीने तिला बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे तो तिच्याजवळ गेला आणि अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजला होता. त्यानंतर तिने कांदिवली पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३५४, ३५४ डी भादवी सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोमवारी पहाटे आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना काळाचौकी परिसरात घडली. ४९ वर्षांची महिला तिच्या आठ वर्षांच्या मुलीसोबत काळाचौकी परिसरात राहते. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही मुलगी वेफर्स आणण्यासाठी दुकानात गेली होती. यावेळी बेकरीमधील काम करणार्या आरोपीने तिला आतमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. घरी गेल्यानंतर हा प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३५४ भादवी सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सोमवारी रात्री ३९ वर्षांच्या आरोपी कर्मचार्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.