दहिसर व सांताक्रुज येथे तीन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग
विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत इडली विक्रेत्यांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ डिसेंबर २०२४
मुंबई, – दहिसर आणि सांताक्रुज येथील दोन वेगवेगळ्या घटनेत पाच ते सहा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमएचबी आणि सांताक्रुज पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन आरोपी दोन्ही इडली विक्रेत्यांना अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
४३ वर्षांची तक्रारदार महिला सांताक्रुज येथे राहत असून तिला सहा वर्षांची एक मुलगी आहे. दुसरी बळीत पाच वर्षांची असून ती तिच्या शेजारीच राहते. २१ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता या दोन्ही मुली त्यांच्या सोसायटीबाहेर खेळत होत्या. यावेळी तिथे इडली विक्री करणारा रमेश आला. त्याने या दोन्ही मुलींना मिठी मारुन त्यांच्या गालाचे चुंबन घेऊन त्यांचा विनयभंग केला होता. शनिवारी हा प्रकार बळीत मुलीच्या लक्षात येताच तिने रमेशला जाब विचारला होता. यावेळी त्याने तिलाच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने सांताक्रुज पोलिसांना हा प्रकार सांगून रमेश पासवान या आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना दहिसर परिसरात घडली. सहा वर्षांची बळीत मुलगी तिच्या पालकांसोबत दहिसर येथील कांदरपाडा परिसरात राहते. दोन दिवसांपूर्वी ती तिच्या मैत्रिणीसोबत घरासमोरील गल्लीत खेळत होती. यावेळी तिथे आलेल्या ५४ वर्षांच्या इडली विक्रेत्याने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने एमएचबी पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी इडली विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली. तक्रारदार महिला आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून आरोपी तिथे इडली विकण्याचे काम करतो असे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.