अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी दोघांना अटक
सायन येथे जन्मदात्या पित्याकडून मुलीचा विनयभंग
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जानेवारी २०२४
मुंबई, – गिरगाव आणि सायन येथे दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्ही. पी रोड आणि वडाळा टी टी पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो गुन्ह्यांची नोंद करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. यातील एका घटनेत जन्मदात्या पित्यानेच त्याच्या सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
सायन कोळीवाडा येथे बळीत सोळा वर्षांची मुलगी राहत असून ४६ वर्षांचा आरोपी तिचा पिता आहे. ५ ऑगस्ट २०२४ ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत तिचा तिचे वडिल अश्लील चाळे करुन विनयभंग करत होते. तिला मारहाण करुन कपडे काढण्यास प्रवृत्त करत होते. इतकेच नव्हे तर विरोध केल्यास पूर्ण कपडे काढून घराबाहेर काढून टाकण्याची धमकी देत होते. हा प्रकार तिने जवळच असलेल्या चर्चमध्ये सांगितला होता. यावेळी तिथे तिला संबंधितांनी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने वडाळा टी टी पोलिसांना हा प्रका सांगून तिच्या पित्याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
दुसर्या गुन्ह्यांतील बळीत मुलगी ही बारा वर्षांची असून ती तिच्या पालकांसोबत गिरगाव परिसरात राहते. तीन दिवसांपूर्वी ती स्टेशनरी घेण्यासाठी दुकानात गेली होती. यावेळी तिथे अभिषेक नावाचा एक व्यक्ती आला. त्याने तिला समोरुन जाणूनबुजून धक्का दिला आणि त्यानंतर तिच्याशी अश्लील संभाषण करुन तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ती घाबरुन घरी गेली होती. गुरुवारी तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने व्ही. पी रोड पोलिसांत अभिषेकविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच ३६ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. अभिषेक हा गिरगाव परिसरात राहत असून त्याची चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.