मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – कांदिवली व गिरगाव येथील दोन विविध घटनेत अकरा आणि सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी व्ही. पी रोड आणि कांदिवली पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांतील आरोपीस व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली तर दुसर्या आरोपीचा कांदिवली पोलिसांकडून शोध सुरु आहे.
३८ वर्षांची तक्रारदार महिला गिरगाव येथे राहत असून बळीत अकरा वर्षांची तिची मुलगी आहे. बुधवारी ही मुलगी भंडारी स्ट्रिट येथून घरी जात होती. यावेळी गोलदेऊल नाक्यावर एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिच्या शरीराला नकोसा स्पर्श करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता. या प्रकाराने ती घाबरली आणि घरी पळत आली. घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने व्ही. पी रोड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गिरगाव येथून नबी अहमद फिरोज अन्सारी या ३० वर्षांच्या मजुराला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
दुसरी घटना कांदिवली परिसरात घडली. सोळा वर्षांची बळीत मुलगी तिच्या पालकासंोबत नालासोपारा येथे राहते. जून २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत कॅटरिंग व्यावसायिक असलेला आरोपी तिचा सतत पाठलाग करत होता. तिला कॉल करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. इतकेच नव्हे तर त्याने तिचे काही अश्लील फोटो तिच्या आईला पाठवून तिची बदनामी करुन विनयभंग केला होता. आईकडून हा प्रकार तिने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. बळीत आणि आरोपी एकाच परिसरातील रहिवाशी असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगतले.