मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मार्च 2025
मुंबई, – अंधेरी येथे एका चौदा वर्षांच्या मुलीचा तिच्याच चुलत काका तर भांडुप येथे आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मावशीच्या प्रियकराने विनयभंग केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी डी. एन नगर आणि कांजूरमार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
14 वर्षांची बळीत मुलगी ही अंधेरी परिसरात राहत असून ती सध्या नववीत शिकते. आरोपी हा तिचा चुलत काका आहे. एप्रिल महिन्यांत ही मुलगी तिच्या घरी एकटीच होती. यावेळी आरोपी तिच्या घरी सरबतचा ग्लास ठेवण्यासाठी आला होता. यावेळी त्याने तिच्या छातीला नकोसा स्पर्श, तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याला समज देत पुन्हा त्यांच्या घरी येण्यास मनाई केली होती. त्यानेही यापुढे त्याच्याकडून अशी चूक होणार नाही तसेच तो त्यांच्या घरी येणार नाही असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली नव्हती. मात्र काही दिवसांनी तो पुन्हा त्यांच्या घराजवळ येऊ लागला होता. यावेळी बळीत मुलीच्या वडिलांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी वाद घालून बघून घेण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर या मुलीने डी. एन नगर पोलिसांत आरोपी चुलत काकांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला ही भांडुप येथे राहत असून तिला आठ वर्षांची मुलगी आहे. शुक्रवारी 7 मार्चला दुपारी बारा वाजता ही मुलगी रस्त्यावरुन जात होती. यावेळी तिथे तक्रारदार महिलेच्या बहिणीचा 19 वर्षांचा प्रियकर आला आणि त्याने तिच्याशी अश्लील कृत्य करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार मुलीकडून तिला समजताच तिने कांजूरमार्ग पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.