गोरेगाव-गोवंडी येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
रेकॉर्डवरील गुन्हेगारासह सुरक्षारक्षकाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – गोरेगाव आणि गोवंडी परिसरात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला गोरेगाव आणि शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
30 वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून तिची नऊ वर्षांची बळीत मुलगी आहे. ती जवळच्याच एका महिलेकडे खाजगी शिकवणीसाठी जाते. त्याच सोसायटीमध्ये दिलीपकुमार हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. गेल्या आठवड्यात 7 मार्चला रात्री नऊ वाजता त्याने तिला टेरेसवर कबूतर दाखवतो असे सांगून तिच्या खांद्याला आणि गालाला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली होती. सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र बुधवारी 12 मार्चला तिने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने गोरेगाव पोलिसांत दिलीपकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसर्या घटनेत एका 28 वर्षांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. बारा वर्षांची बळीत मुलगी गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहते. याच परिसरात मोहम्मद आरिफ हा राहत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह बलात्कार, विनयभंग, गंभीर दुखापत करणे, मारामारी, गंभीर दुखापत करुन रॉबरी करणेअशा 20 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई झाली होती. तो बळीत मुलीचा पाठलाग करुन तिला अश्लील इशारे करुन तिचा मानसिक शोषण करत होता. या घटनेनंतर तिच्या आईने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे तो त्याच्या मित्रांसोबत तिच्या घरासमोर बसून नशा करुन दरवाज्याला लाथा मारणे, त्याच्याविरुद्ध तक्रार केल्यास सर्वांना ठार मारुन खाडीमध्ये मृतदेह फेंकून देऊ अशा धमक्या देत होता. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.