मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मे 2025
मुंबई, – सांताक्रुज आणि ताडदेव येथे आठ आणि नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा त्यांच्याच परिचित आरोपींनी विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका 63 वर्षांच्या वयोवृद्धासह 35 वर्षांच्या आरोपीस निर्मलनगर आणि ताडदेव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
45 वर्षांची तक्रारदार महिला ही सांताक्रुज येथे राहते. तिला नऊ वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. याच परिसरात 63 वर्षांचा वयोवृद्ध आरोपी राहतो. सोमवारी 5 मेला तिची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत घरासमोरच खेळत होती. यावेळी तिथे आरापेी आला आणि त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्याशी अश्लील इशारे करुन तिला घरी आणून त्याने तिच्या शरीरासह छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगताच तिने वयोवृद्ध आरोपीविरुद्ध निर्मलनगर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 63 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.
दुसर्या घटनेत एका आठ वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार ताडदेव परिसरात उघडकीस आला आहे. मेहंदी आर्टिस्ट असलेली तक्रारदार महिला ताडदेव येथे राहत असून बळीत तिची मुलगी आहे. याच परिसरात 35 वर्षांचा आरोपी राहतो. रविवारी 4 मेला आरोपीने तिला पिझ्झा देतो असे सांगून घरी आणले, तिचे कपडे काढून तिला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता. हा प्रकार समजताच तक्रारदार महिलेने आरोपीविरुद्ध ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमातर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध ताडदेव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल असून त्याच्याविरुद्ध दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी एकमेकांच्या परिचित असून शेजारी राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.