तेरा व पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 मे 2025
मुंबई, – भांडुप आणि बोरिवली परिसरात तेरा व पंधरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीचा त्यांच्याच परिचित आरोपींनी विनयभंग केला आहे. याप्रकरणी गोराई आणि भांडुप पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत 50 आणि 58 वर्षांच्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी एक आरोपी पोलीस कोठडीत आहे तर दुसर्‍या अटकेनंतर 35 (3) नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

पहिल्या गुन्ह्यांत बळीत मुलगी पंधरा वर्षांची असून ती बोरिवली येथे राहते. याच परिसरातील शाळेत ती सध्या शिक्षण घेते. मंगळवारी दुपारी दोन वाजता ती परिसरातून पायी चालत जात होती. यावेळी तिच्याच परिचित आरोपीने तिच्या छातीसह पाठीवरुन नकोसा स्पर्श करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. घरी आल्यानंतर तिने तिच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिने घडलेला प्रकार गोराई पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला सायंकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली.

दुसरी घटना भांडुप परिसरात घडली. तेरा वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत भांडुप येथे राहते. सोमवारी सायंकाळी ती रस्त्यावरुन जात होती. यावेळी 58 वर्षांच्या आरोपीने तिचा पाठलाग केला होता. काही वेळानंतर त्याने तिचा हात पकडून अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. मुलीकडून हा प्रकार समजताच तिच्या आईने आरोपीविरुद्ध भांडुप पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. नंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page