वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

दहिसर-मानखुर्द येथील घटना; दोन्ही आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या शुक्रवारी दिवसभरात सात व दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार दहिसर आणि मानखुर्द परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमएचबी आणि मानखुर्द पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

30 वर्षांची तक्रारदार महिला दहिसर येथे राहत असून बळीत ही तिची दहा वर्षांची मुलगी आहे. शुक्रवारी दुपारी सव्वाबारा वाजता ही मुलगी घरात एकटीच होती. यावेळी तिच्या घरात आरोपी आला होता. घरी कोणीही नसल्याची खात्री होताच त्याने बळीत मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तो तेथून पळून गेला होता. हा प्रकार नंतर तिने तिच्या आईला सांगितला होता. त्यानंतर तिने एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या 30 वर्षांच्या आरोपी पेंटर तरुणाला सायंकाळी पोलिसांनी दहिसर येथून अटक केली.

दुसरी घटना मानखुर्द परिसरात घडली. सात वर्षांची बळीत मुली मानखुर्द परिसरात तिच्या पालकांसोबत राहते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता या मुलीला त्याच परिसरात राहणार्‍या 27 वर्षांच्या आरोपीने त्याच्या घरी बोलावलिे होते. तिच्याशी अश्लील चाळे करुन त्याने तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून त्याने तिला घरी पाठवून दिले. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. त्यानंतर तिने आरोपीविरुद्ध मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page