मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जुलै २०२४
मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) – बोरिवली आणि माटुंगा येथील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन कॉलेज तरुणींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोरिवली रेल्वे आणि माटुंगा पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगाचा गुन्हा नोंदवून एका आरोपीस अटक केली तर दुसर्या आरोपीचा शोध सुरु आहे. राजेंद्र मजगर असे अटक आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी सायंकाळी बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनच्या एक्सलेटरवर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अठरा वर्षांची ही तरुणी बोरिवली परिसरात तिच्या पालकांसोबत राहते. ती शिक्षण घेत असून एका नामांकित कॉलेजमध्ये शिकते. बुधवारी दुपारी ती कामानिमित्त अंधेरीला गेली होती. सायंकाळी काम संपल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघाली. सायंकाळी ती बोरिवली रेल्वे स्थानकात आली. फलाट तीनच्या एक्सलेटरवरुन जाताना मागे उभ्या असलेल्या एका तरुणाने अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तिने आरडाओरडा केल्यानंतर तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिने घडलेला प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यानंतर राजेंद्र नावाच्या आरोपीस रेल्वे पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजेंद्रविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते.
दुसर्या घटनेत एका १९ वर्षांच्या कॉलेज तरुणीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केला. ही तरुणी चेंबूर येथे राहत असून माटुंगा येथील एका कॉलेजमध्ये शिकते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ती कॉलेजवरुन घरी जात होती. महेश्वरी बसस्टॉपजवळ असताना तिच्याकडे जगदीश राणे नाव सांगणारा एक व्यक्ती आला. त्याने तिला टॅक्सीने घरी सोडतो असे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बस आल्यानंतर ती बसमध्ये चढली. तिच्या पाठोपाठ तोदेखील बसमध्ये चढला आणि तिच्या शेजारी बसला होता. त्याने पुन्हा तिच्याशी अश्लील संभाषण करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर त्याचे ऐकले नाहीतर तिला पळवून नेण्याची धमकीच त्याने दिली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली. तिचा स्टॉप आल्यानंतर ती बसमधून उतरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी माटुंगा पोलिसांना ही माहिती सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिताच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. महेश्वरी बसस्टॉप आणि चेंबूर परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.