जोगेश्वरी-घाटकोपर येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
३८ वर्षांच्या आरोपीस अटक तर डिलीव्हरी बॉयचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – जोगेश्वरी आणि घाटकोपर येथील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंतनगर आणि मेघवाडी पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यातील एका गुन्ह्यांत ३८ वर्षांच्या आरोपीस पंतनगर पोलिसांनी अटक केली तर डिलीव्हरीनंतर पळून गेलेल्या डिलीव्हरी बॉयचा मेघवाडी पोलीस शोध घेत आहेत.
३० वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपर परिसरात राहत असून तिला तेरा वर्षांची मुलगी आहे. ३८ वर्षांचा मोहम्मद जान हा आरोपी याच परिसरात राहत असून तो गेल्या सहा महिन्यांपासून या मुलीचा सतत पाठलाग करुन तिचा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. अश्लील संभाषण करुन तिच्याशी नकोसे कृत्य करुन तिचा विनयभंग करत होता. सुरुवातीला या मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्याच्याकडून सतत होणार्या मानसिक छळाला कंटाळून ती कंटाळून गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती रस्त्यावरुन जात होती. यावेळी तिथे मोहम्मद जान आला आणि त्याने तिला चॉकलेट देण्याचा बहाणा करुन तिला त्याच्या घरी येण्यास सांगून तिच्याशी अश्लील वर्तन केले होते. त्यामुळे घडललेा प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. या घटनेनंतर तिने पंतनगर पोलिसांत मोहम्मद जानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन ३८ वर्षांच्या आरोपीस अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
दुसरी घटना जोगेश्वरी परिसरात घडली. ३९ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत जोगेश्वरी परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीने ऑनलाईन किराणा सामानाची ऑर्डर दिली होती. गुरुवारी रात्री आठ वाजता सामान घेऊन शैलेंद्र नावाचा तरुण त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने त्यांच्या बारा वर्षांच्या मुलीशी अश्लील संभाषण करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार मुलीकडून समजताच तक्रारदारांनी मेघवाडी पोलिसात शैलेंद्रविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या शैलेंद्रचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.