शहरात दोन घटनेत तरुणीसह विवाहीत महिलेचा विनयभंग
अंधेरी-सांताक्रुजची घटना; पती-पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत एका तरुणीसह विवाहीत महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटना अंधेरीतील इर्ला आणि सांताक्रुज परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जुहू आणि वाकोला पोलिसांनी एका पती-पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मोशलीन नूरमोहम्मद गाझी या आरोपी तरुणाला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे.
३० वर्षांची तक्रारदार तरुणी ही तिच्या आईसोबत अंधैरीतील ईला ब्रिज परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिच्याच परिचित नाडर पती-पत्नी असून ते तिच्या कामाविषयी चुकीची माहिती तिच्या आईची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे तिचे त्यांच्याशी सतत खटके उडत होते. या दोघांकडून जिवाची भीती वाटत असल्याने तिने तिच्या फ्लॅटबाहेर सीसीटिव्ही कॅमेरा आणि वायफाय केबल लावले होते. त्याची वायर या दोघांनी तोडून टाकली होती, त्यामुळे तिने त्यांच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ती तिच्या आईसोबत जात होती. यावेळी तिथे ऍन्थोनीदास आणि जिग्ना आले. या दोघांनी तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिचे इमारतीच्या अध्यक्ष आणि चिटणीससोबत संबंध असल्याचे सांगून तिच्यावर बेछूट अश्लील आरोप केले होते. यावेळी जिग्नाने तिला तिचे पती तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करुन तिला कोठे फेंकून देतील हेदेखील समजणार नाही अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर या मायलेकींनी घडलेला प्रकार जुहू पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ऍन्थोनीदास नाडर आणि जिग्ना ऍन्थोनीदास नाडर या पती-पत्नीविरुद्ध विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना सांताक्रुज परिसरात घडली. २४ वर्षांची तक्रारदार महिला ही वाकोला परिसरात तिचे पती आणि दोन वर्षांच्या मुलासोबत राहते. ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर तिच्या पतीने पानटपरीचे दुकान आहे. रविवारी रात्री दहा वाजता ती तिच्या मैत्रिणीच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर ती वाकोला, धोबीघाट, डॉ. मांजरेकर क्लिनिकसमोरुन जात होती. यावेळी तिच्या परिचित मोशलीने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते. यावेळी तिने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. घडलेला प्रकार तिने तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात मोशलीनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन मोशलीन नूरमोहम्मद गाझीला अटक केली.