दोन हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस कर्नाटक येथून अटक

कोलकात्यात सावत्र आईसह तीन भावडांची तर वसईत मित्राची हत्या केली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
वसई, – दोन हत्येच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस वसई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी कर्नाटक येथून अटक केली. निरंजनकुमार ऊर्फ रंजन ऊर्फ अक्षय विजयकुमार शुक्ला असे या 40 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला माणिकपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनवली आहे. निरंजनकुमारवर 2002 साली त्याच्या सावत्र आईसह तीन भावडांची तर 2008 साली वसई येथे शेजारी राहणार्‍या तरुणाची हत्या केल्याचा आरोप असून त्याच्या अटकेने माणिकपूर आणि हलदिया पोलीस ठाण्याच्या दोन्ही हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. माणिकपूरनंतर त्याचा ताबा कोलकाता पोलिसांकडे सोपविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनोज तिवारी हा 25 वर्षांचा तरुण वसईच्या वालिव परिसरात राहतो. आरोपी निरंजनकुमार हा त्याच्याच शेजारी राहत होता. ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्या राहत्या घराच्या सामाईक भिंतीवरुन त्यांच्यात काही दिवसांपासून वाद होता. याच वादातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. त्यातूनच 26 मार्च 2008 रोजी निरंजनकुमारने मनोजची वालिव येथील चिंचपाडा, कल्पतरु इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात हत्या केली होती. सुरुवातीला त्याचे डोके भिंतीवर आपटून नंतर त्याचा आवळला होता. त्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी निरंजनकुमारविरुद्ध हत्येचा गुंन्हा दाखल केला होता. या हत्येनंतर राजू हा पळून गेला होता. त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता. गेल्या सतरा वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही त्याचा माणिकपूर व गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी शोध सुरुच ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना निरंजनकुमार हा कर्नाटकच्या बंगलोर, महादेवपूरा, कामधेनूनगर परिसरात राहत असल्याची माहिती वसई युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी एक टिम तिथे पाठविण्यात आली होती. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने निरंजनकुमारला महादेवपूरा येथून शिताफीने ताब्यात घेतले होते. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे खरे नाव निरंजनकुमार विजयकुमार शुक्ला असल्याचे उघडकीस आले. 2002 रोजी तो त्याच्या वडिलांसह सावत्र आई चार भावडांसोबत कोलकाता येथील मिदनापूर येथे राहत होता. त्याची सावत्र आई त्याचा मानसिक शोषण करत होती. त्याचा सतत छळ करत होती. तिच्या जाचाला तो कंटाळून गेला होता. त्यातून त्यांच्यात सतत वाद होत होती. या वादातून 26 फेब्रुवारी 2002 रोजी त्याने त्याच्या राहत्या घरी सावत्र आई गिताकुमार शुक्ला, सात वर्षांची सावत्र बहिण पूजाकुमारी आणि सहा वर्षांची प्रियांकाकुमारी, दोन वर्षांचा भाऊ मान यांची हत्या केली होती.

या चौघांच्या हत्येनंतर वडिल विजयकुमार शुक्ला यांच्या तक्रारीवरुन हलदिया पोलिसांनी निरंजनकुमार शुक्लाविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येनंतर तो कोलकाता येथून पळून गेला होता. तेव्हापासून तो वसई, ठाणे, नवी मुंबई शहरात अक्षय विजय शुक्ला व रंजन विजयकुमार शुक्ला या नावाने वास्तव्यास होता. स्वतची ओळख लपवून अटकेच्या भीतीने लपून बसला होता. वसई येथे राहत असताना त्याने मनोज तिवारीची हत्या केली होती. या हत्येनंतरही तो पुन्हा पळून गेला होता. मात्र सतरा वर्षांपासून फरार असलेल्या निरंजनकुमारला कर्नाटक येथून अटक केली. त्याच्या अटकेनंतर 23 वर्षांपूर्वी कोलकाता येथे झालेल्या चार हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या अटकेची माहिती हलदिया पोलिसांना देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा ताबा लवकरच संबंधित पोलिसांना देण्यात येणार आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वसई युनिटचे पोलीस निरीक्षक समीर आहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजीत गिते, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रविंद्र पवार, मुकेश पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, राजाराम काळे, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकूर, पोलीस अंमलदार अंकित सुतार, राहुल कर्पे, अनिल साबळे, अजीत मेड, प्रतिक गोडगे, राजकुमार गायकवाड, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी, सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page