काळाचौकी-धारावीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांची हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2026
मुंबई, – गेल्या 24 तासांत काळाचौकी आणि धारावी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन व्यक्तींची हत्या झाली. याप्रकरणी काळाचौकी आणि शाहूनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या गुन्ह्यांची नोंद करुन दोन्ही गुन्ह्यांत पाच आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या चार आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे तर पाचव्या आरोपीला बुधवारी कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्या झालेल्यांमध्ये राजीव ऊर्फ पहाडीकुमार यादव आणि धीरजकुमार ठाकूर यांचा समावेश आहे.
पहिली घटना रविवारी रात्री उशिरा सव्वाबारा वाजता परळ येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या स्टोर रुममध्ये घडली. रोहितकुमार बबलू सिंग हा 22 वर्षांचा तरुण मूळचा बिहारचा रहिवाशी असून तो बिगारी कामगार आहे. सध्या तो एका खाजगी कंपनीसाठी परळच्या गांधी हॉस्पिटल, पीडब्ल्यूडी विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. दिवसा काम करुन या कामगारांसाठी ठेकेदाराने हॉस्पिटलच्या स्टोर रुममध्ये राहण्याची सोय केली होती. त्याच्यासोबत राजीव यादव आणि रामजीकुमार प्रभू राऊत हे दोघेही तिथे कामाला असून ते दोघेही मूळचे बिहारचे रहिवाशी आहेत. कामाच्या ठिकाणी राजीवने जुनी भंगार वायर लपवून ठेवली आहे. या वायरची तो परस्पर विक्री करणार आहे असा रामजीकुमारला संशय होता.
याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. रविवारी रात्री उशिरा सव्वाबारा वाजता याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी रागाच्या भरात रामजीकुमारने राजीववर हातोड्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या कानाला, कानाच्या मागे गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेल्या राजीवला नंतर इतर कर्मचार्यांनी तातडीने गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती प्राप्त होताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सोहितकुमार याच्या जबानीवरुन पोलिसांनी रामजीकुमार राऊत याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या रामजीकुमारला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
दुसरी घटना धारावी परिसरात घडली. धीरजकुमार ठाकूर हा धारावी येथे राहत असून तिथेच त्याचा कपड्याला प्रिटींग करण्याचा कारखाना आहे. हा कारखाना त्याने भाडेतत्त्वावर घेतला असून तो त्याचा मालक आहे. सोमवारी रात्री त्याचे चार तरुणांशी क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर या चौघांनी धीरज ठाकूरवर लाकडी बांबू, कैची आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. धीरजला पोलिसांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना चारही आरोपींना काही तासांत पोलिसांनी अटक केली. या चौघांपैकी ओसामा बेन शेख, मोहम्मद अरमान शेख आणि मोहम्मद ओवेस कलिम या तिघांना मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांचा अन्य एका सहकार्याला मंगळवारी अटक करण्यात आली असून त्याला बुधवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.