मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – शिवडी येथे अकरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच ४१ वर्षांच्या जन्मदात्या पित्याने लैगिंक अत्याचार केला तर कांदिवलीतील चारकोप परिसरात आठ वर्षांच्या मुलावर त्याच्याच शेजारी राहणार्या एका ६५ वर्षांच्या वयोवृद्धाने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारकोप आणि रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी पित्यासह वयोवृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
घरकाम करणारी ३२ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती आणि अकरा वर्षांच्या मुलीसोबत शिवडी परिसरात राहते. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत ती कामासाठी बाहेर होती. यावेळी घरात एकटीच असलेल्या तिच्या मुलीवर तिच्याच पतीने अश्लील चाळे करुन लैगिंक अत्याचार केला होता. ऑक्टोंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत तीन वेळा त्याने स्वतच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस यासाठी तो तिला धमकावत होता. सोमवारी हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजताच तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने तिला रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात आणले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी पित्याविरुद्ध ६४ (२), ६५ (२), ३५२ भारतीय न्याय सहिता सहकलम ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सोमवारी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात घडली. ३१ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत असून तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. ६५ वर्षांचा आरोपी वयोवृद्ध त्यांच्याच शेजारी राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. रविवारी सकाळी दहा तिचा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. यावेळी तिथे आरोपी वयोवृद्ध आला आणि त्याने त्याला बिस्कीट देऊन त्याच्याशी अश्लील चाळे करुन त्याचा विनयभंग केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे बोलून तो निघून गेला होता. दुसर्या दिवशी हा प्रकार या मुलाने त्याच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने चारकोप पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी वयोवृद्धावर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.