मनकासेच्या उपाध्याक्षला अंडरट्रायर ड्रग्ज तस्कराकडून धमकी
बंदोबस्तात हलगर्जीपणा करणारे दोन पोलीस सेवेतून निलंबित
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मे 2025
मुंबई, – महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमीत मतकर यांना त्यांच्याच कार्यालयात घुसून एका ड्रग्ज तस्कराने धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इम्रान खान या ड्रग्ज तस्कराविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांनी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इम्रानला विशेष सेशन कोर्टातून आर्थर रोड जेलमध्ये नेत असताना हा प्रकार घडला होता, त्यामुळे त्याच्यासोबत बंदोबस्तात असलेल्या दोन पोलिसांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर पोलीस सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोघांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमीत मतकर हे मनसेचे पदाधिकारी असून सध्या मनकासेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे आग्रीपाडा येथील सातरस्ता परिसरात कार्यालय आहे. गेल्या आठवड्यात ते त्यांच्या कार्यालयात होते, यावेळी तिथे अमीत मतकर आला आणि त्याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. चौकशीदरम्यान इम्रान हा अंडरट्रायल आरोपी आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्याला ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी 40 किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
विशेष कोर्टात त्याची सुनावणी सुरु असून याच सुनावणीसाठी त्याला 16 मेला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात कोर्टातून आर्थर रोड कारागृहात नेण्यात येत होते. यावेळी त्याच्या बंदोबस्तासाठी दोन पोलीस कर्मचारी तैनात होते. या दोघांची नजर चुकवून तो मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्याक्ष अमीत मतकर यांच्या कार्यालयात गेला होता. त्यांना त्याने धमकी दिली होती. अंडरट्रायल आरोपीकडून ही धमकी देण्यात आल्याने त्यांनी आग्रीपाडा पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीसोबत त्यांनी त्यांच्या कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना दिले होते. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत इम्रान खानविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन्ही पोलिसांना आता पोलीस आयुक्तांनी पोलीस सेवेतून निलंबित केले आहे. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.