मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2025
मुंबई, – वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करुन विरारहून अपहरण केलेल्या एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मालवणी आणि नंतर जंगलात नेऊन लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहरणासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सलमान नावाच्या एका 20 वर्षांच्या आरोपी तरुणाला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंधरा वर्षांची पिडीत मुलगी विरार येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून एका खाजगी शाळेत शिक्षण घेते. शनिवारी सकाळी अकरा वाजता ती तिच्या घराजवळील दुकानात गेली होती. तिथेच तिला सलमान भेटला. त्याने तिला तो तिच्या वडिलांचा मित्र असल्याचे सांगून तिला तिच्या वडिलांकडे सोडतो असे सांगितले. त्यानंतर तो तिला विरारहून मालाडच्या मालवणी परिसरात घेऊन आला. मालवणीतील त्याच्या घरी आणल्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने तिला बाईकवरुन विरार येथील घरी सोडतो असे सांगून घेऊन गेला. याच दरम्यान त्याने तिला एका जंगलात आणले आणि तिथे पुन्हा तिच्यावर लैगिंक अत्याचार केला हातेा.
हा प्रकार कोणालाही सांगू नकोस. तुझा मी व्हिडीओ बनविला आहे. ही माहिती कोणाला सांगितली तर तुझा व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच तिच्यासह तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. स्वतची दशहत निर्माण व्हावी म्हणून त्याने तिला बेदम मारहाण केली होती. विरार येथे घरी आल्यांनतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. या घटनेनंतर त्यांनी हा प्रकार मालवणी पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध अपहरणासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सलमान या आरोपीस मालवणी येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच पिडीत मुलीचे अपहरण करुन तिच्यावर दोन वेळा लैगिंक अत्याचार केला. तिच्यासह तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत सोमवारी दुपारी त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाणी पिण्याचा बहाणा करुन चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार
दुसर्या घटनेत थंड पाणी पिण्याचा बहाणा करुन घरी आणलेल्या एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या 55 वर्षांच्या व्यक्तीने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
37 वर्षांची तक्रारदार महिला ही बोरिवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला चार वर्ष दहा महिने वय असलेली पिडीत मुलगी असून तिच्याच शेजारी आरोपी राहतो. रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजता या मुलीला आरोपीने थंड पाणी पिण्याचा बहाणा करुन त्याच्या घरी आणले. त्यानंतर त्याने तिचे कपडे काढून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. घरी आल्यानंतर या मुलीकडून हा प्रकार समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या घटनेनंतर तिने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत 55 वर्षांच्या आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा आरोपीस पोलिसांनी अटक केली.