नऊ व सोळा वर्षांच्या अल्पयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
अल्पवयीन भावासह दोन्ही मुलांची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मे 2025
मुंबई, – वडाळा परिसरात राहणार्या नऊ आणि सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर पंधरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी लैगिंक अत्याचार केला. यातील एका घटनेत भावानेच बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वडाळा आणि वडाळा टी टी पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी भावासह दोन्ही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी सोळा वर्षांची असून ती सध्या शिक्षण घेत आहेत. पंधरा वर्षांचा आरोपी तिचा भाऊ असून 1 मार्च ते 31 मार्च 2025 या कालावधीत त्यानेच त्याच्या एक वर्षांनी मोठी असलेल्या बहिणीवर लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ही गरोदर राहिली होती. केईएम हॉस्पिटलमध्ये मेडीकल केल्यानंतर ती दिड महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर ती माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून वडाळा टी पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये पिडीत मुलीची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून तिच्याच लहान भावाने तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. त्यांनतर तिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला ताब्यात घेऊन डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला 42 वर्षांची असून ती वडाळा परिसरात राहते. तिला नऊ वर्षांची मुलगी आहे. याच परिसरात पंधरा वर्षांचा आरोपी राहत असून तक्रारदार महिलेच्या मुलाचा तो जवळचा मित्र आहे. ते दोघेही एकमेकांच्या परिचित असून त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. बुधवारी सायंकाळी चार वाजता त्याने पिडीत मुलीला पाण्याची खाली बाटली भरुन आणण्यासाठी सांगितले होते. त्यानतर तो तिच्या मागे गेला आणि त्याने तिला त्याच्या घरी आणले. तिचे कपडे काढून त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. तिने विरोध करुनही त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारु अशी धमकी देऊन त्याने तिला सोडून दिले होते. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला.
मुलीकडून हा प्रकार समजताच तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने वडाळा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पंधरा वर्षांच्या आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. बुधवारी उघडकीस आलेल्या या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.