मानखुर्द-गोवंडीत दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जून 2025
मुंबई, – मानखुर्द आणि गोवंडी परिसरात तेरा व आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच परिचित आरोपींनी लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मानखुर्द आणि गोवंडी पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तेरा वर्षांची मुलगी गरोदर असून तिला शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यातील पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला तिच्या कुटुुंबियांसोबत मानखुर्द परिसरात राहते. तिला तेरा वर्षांची एक मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. 1 डिसेंबर 2024 ते 4 जून 2025 या कालावधीत तिची मुलगी तिच्याच गल्लीत राहणार्‍या एका महिलेकडे अरबी शिकण्यासाठी तसेच रात्रीच्या वेळेस झोपण्यासाठी जात होती. यावेळी या महिलेच्या पतीने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे केले होते. तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. याच संबंधातून ही मुलगी गरोदर राहिली होती. मेडीकलमध्ये ती गरोदर असल्याचा रिपोर्ट प्राप्त होताच हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या महिलेने शेजारीच राहणार्‍या 31 वर्षांच्या आरोपीविरुद्ध मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरेपीस पोलिसांनी अटक केली. पिडीत मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना ताजी असताना गोवंडी येथे एका आठ वर्षांच्या मुलीशी लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकारउघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच 50 वर्षांच्या आरोपीस गोवंडी पोलिसांनी अटक केली. ही मुलगी गोवंडी परिसरात तिच्या पालकांसोबत राहते. बुधवारी सकाळी नऊ वाजता ही मुलगी घरी एकटीच होती. यावेळी तिच्या परिचित आरोपी तिच्या घरी आला. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी लैगिंक चाळे करुन अत्याचार केला होता. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने आरोपीविरुद्ध गोवंडी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपीना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page