मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जुलै २०२४
मुंबई, – सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना चेंबूर आणि जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद होताच दोन्ही आरोपींना आरसीएफ आणि ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. शब्बीर आणि राहुल अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी सोळा वर्षांची असून ती जोगेश्वरी परिसरात राहते. सध्या ती शिक्षण घेत असून दोन वर्षापूर्वी तिची राहुलसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची मैत्री आणि प्रेमसंबंध आले होते. याच दरम्यान राहुलने तिच्यावर दोन वेळा लैगिंक अत्याचार केला होता. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना तो तिचा शाळेत जाताना पाठलाग करुन विनयभंग करत होता. तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकी देत होता. काही दिवसांपूर्वी त्याने तिच्या वडिलांसह भावाला शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी या तरुणीने त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर राहुलविरुद्ध पोलिसांनी ३७६ (२), (एन), ३५४ (डी), ५०४, ५०६ भादवी कलमांतर्गत ६, १०, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोमवारी आरोपीस पोलिसांनी अटक केली.
दुसर्या घटनेतील तक्रारदार चेंबूर येथे राहत असून त्यांना सोळा वर्षांची एक मुलगी आहे. ती सध्या शिक्षण घेत असून एका खाजगी क्लासेसला शिकवणीसाठी जाते. दोन वर्षांपूर्वी याच क्लासने एका पिकनिकचे आयोजन केले होते. तिथेच तिची शब्बीरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध झाले होते. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर त्यांच्या सप्टेंबर २०२२ ते जून २०२४ या कालावधीत शारीरिक संबंध आले होते. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केले होते. प्रत्येक वेळेस तो तिला आपण लग्न करणार असल्याचे सांगत होता. अलीकडेच हा प्रकार मुलीच्या वडिलांना समजला होता. त्यामुळे त्यांनी शब्बीरविरुद्ध आरसीएफ पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६ (२), (एन) भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रविवारी शब्बीरला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.