दोन अल्पवयीन मुलीवर परिचिताकडून लैगिंक अत्याचार
दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन दोन्ही आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जुलै 2025
मुंबई, – पाच आणि दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच परिचित व्यक्तीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना दहिसर आणि शिवडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमएचबी आणि शिवडी पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी पाच वर्षांची असून ती तिच्या पालकांसोबत दहिसर परिसरात राहते. याच परिसरात 35 वर्षांचा आरोपी राहत असून बिगारी कामगार आहे. मंगळवारी 22 जुलैला सकाळी अकरा वाजता ही मुलगी तिच्या घरी होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिला रिक्षातून त्याच्या घरी आणले. तिथे त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे करुन लैगिंक अत्याचार केला होता. तिला घरी पाठवून त्याने तिला हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली होती. गुरुवारी हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने एमएचबी पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहितेसह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत काही तासांत आरोपीस पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना शिवडी परिसरात घडली. तक्रारदार महिला ही अॅण्टॉप हिल परिसरात राहत असून ती घरकाम करते. तिची पिडीत दहा वर्षांची मुलगी आहे. रविवार 20 जुलैला तिची मुलगी तिच्या भावासोबत खेळण्यासाठी जवळच असलेल्या नाक्यावर गेली होती. यावेळी त्याच परिसरात राहणारा आरोपी तिथे आला. त्याने त्यांना खाऊ देण्याचा बहाणा करुन गार्डनबाहेर आणले. त्यानंतर पिडीत मुलीशी जवळीक साधून त्याने तिच्याशी लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तुझा जीव घेईन अशी धमकी देऊन त्याने तिला सोडून दिले होते.
या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. शनिवारी ही माहिती तिच्याकडून तिची तक्रारदार आईला समजली होती. त्यानंतर तिने आरोपी तरुणाविरुद्ध अॅण्टॉप हिल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.