मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुंबई शहरात सुरु असलेल्या दोन सेक्स रॅकेटचा मालाड पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून एका तरुणीसह चार महिलांची सुटका केली. मेडीकलनंतर या सर्व महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. चारही आरोपीविरुद्ध भारतीय दंड सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई शहरात काही तरुणीसह महिलांच्या गरीबीसह आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना काहीजण वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा सेक्स रॅकेटच्या विरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही कारवाई सुरु असताना पूर्णता या एनजीओकडून गुन्हे शाखेला काही महिला विविध ग्राहकांकडून मोबदला घेऊन त्यांच्यासोबत काही अल्पवयीन मुलीसह तरुणींना शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने संबंधित महिलांना संपर्क साधून त्यांच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती. सर्व व्यवहार फोनवरुन ठरल्यानंतर त्यांना चेंबूरच्या सी. जी गिडवाणी मार्ग परिसरात असलेल्या एका गेस्ट हाऊसमध्ये बोलविण्यात आले होते. बुधवारी दुपारी तीन वाजता तिथे दोन महिला एका 19 वर्षांच्या तरुणीसोबत आल्या होत्या.
यावेळी या महिलांचे बोगस ग्राहकांसोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज, महिला उपनिरीक्षक माशेरे, बेळणेकर, सहाय्यक फौजदार पारकर, पोलीस हवालदार तुपे, सोनावणे, बैलकर, डगळे, खेडकर, महिला पोलीस शिपाई जानकर, सरोदे आणि एनजीओच्या पदाधिकार्यांनी छापा टाकला होता. या कारवाईत दोन्ही महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्या तावडीतून तरुणीची सुटका केली. तिच्या चौकशीतून या महिला तिला ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले. या दोन्ही महिलांसह बळीत तरुणीला नंतर चेंबूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. दोन्ही महिलांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. बळीत मुलीला मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यातआले होते.
या कारवाईपूर्वी मालाड पोलिसांनी एका स्पामध्ये कारवाई करुन स्पाच्या मॅनेजरसह त्याचा मदतनीस अशा दोघांना अटक केली. रेहान एजाज अहमद खान आणि शुभम स्वामीनाथ गुप्ता अशी या दोघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून त्यांना कांदिवलीतील रेस्क्यू होममध्ये पाठविण्यात आले आहे. मालाडच्या न्यू लिंक रोड, सॉलिटर एक इमारतीमध्ये स्काय थाय नावाचे एक स्पा सेंटर आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाने काही महिला कर्मचार्यांना ग्राहकासोबत वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा केली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच मंगळवार 5 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता पोलिसांनी तिथे छापा टाकला होता.
यावेळी पोलिसांनी स्पाचा मॅनेजर रेहान खान, मदतनीस शुभम गुप्ता या दोघांना अटक केली तर स्पामध्ये असलेल्या चार महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीतून तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले आहे. या चारही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कांदिवलीतील रेस्क्यू होमध्ये पाठविण्यात आले. स्पाची मालकीण नितू योगेश मेहरा ऊर्फ नितू कैलास गुहानिया असून तिला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.