दोन घटनेत कर्मचार्‍यांकडून 65 लाखांच्या कॅशची चोरी

चोरीच्या स्वतंत्र गुन्हे दाखल करुन आरोपींचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – शहरात दोन घटनेने तीन कर्मचार्‍यांनी कार्यालयातील सुमारे 65 लाख रुपयांची कॅश घेऊन पलायन केल्याची घटना गिरगाव आणि पोफळवाडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग आणि व्ही. पी रोड पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपी कर्मचार्‍यांचा शोध सुरु केला आहे. आरोपींमध्ये नारायण सोनू कुंभेकर, हनुमान राम आणि बेहरा राम यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार निलेश समरथमल दोषी हे मेटल व्यापारी आहेत. त्यांचा गिरगाव येथील पहिली सुतारगल्लीत सॅडोज मेटल्स इंडिया नावाची एक फर्म आहे. त्यांच्या फर्ममध्ये चार कर्मचारी कामाला असून त्यात दोन महिलांसह हनुमान राम आणि बेहरा राम यांचा समावेश आहे. ते दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी असून त्यांच्यावर सकाळी कार्यालय उघडणे आणि रात्री कार्यालय बंद करणे, कार्यालयीन कामासाठी बाहेर जाणे आदी जबाबदारी होती. शनिवारी ते त्यांच्या कार्यालयात होते. त्यांना सुप्रिम सिल्क मिल्कचे मालक उत्तम जैन यांना व्यवसायाचे 40 लाख रुपये येणे बाकी होते. ही रक्कम घेण्यासाठी त्यांनी हनुमान आणि बेहरा यांना पाठविले होते. त्यामुळे ते दोघेही उत्तम जैन यांच्याकडे गेले होते, 40 लाख रुपयांची कॅश घेतल्यानंतर ते दोघेही निघून गेले. मात्र बराच वेळ होऊन ते कार्यालयात आले नाही. त्यामुळे निलेश दोषी यांनी त्यांना कॉल केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी उत्तम जैन यांना कॉल करुन विचारणा केली होती. यावेळी त्यांनी ते दोघेही 40 लाख रुपये घेऊन निघून गेल्याचे सांगितले. ही कॅश कार्यालयात घेऊन न येता ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांनी दुसर्‍या दिवशी व्ही. पी रोड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हनुमान राम आणि बेहरा राम या दोघांविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसर्‍या गुन्ह्यांत नारायण सोनू कुंभेकर या कर्मचार्‍याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मौलिक दिनेशभाई पटेल हे पोफळवाडी येथे एका अंगाडियाच्या कार्यालयात मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या कार्यालयातून मौल्यवान वस्तू, कॅश आदी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचविण्याचे काम केले जाते. त्यासाठी त्यांनी नारायण कुंभेकर याला कामावर ठेवले होते. तो कार्यालयातील साफसफाईसह इतर काम करत होता. शुक्रवारी त्यांनी कार्यालयात 25 लाखांची कॅश तीन वेगवेगळ्या पार्सलमध्ये ठेवले होते. मात्र नंतर त्यांना ते पार्सल कुठेच सापडले नाही. त्यात सोनू कुंभेकर हादेखील गायब होता. तो कार्यालयातून कोणाला काहीही न सांगता पळून गेला होता. त्यामुळे त्यानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन मौलिक पटेल यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नारायणविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी कर्मचारी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी व्ही. पी रोड आणि एल. टी मार्ग पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page