मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
उल्हासनगर, – उल्हासनगरचा रहिवाशी असलेला पंकज हिरामण निकम ऊर्फ बबल्यू या २९ वर्षांच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी सचिन ऊर्फ बबल्यू आनंद डिगे याला काही तासांत उल्हासनगर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर सचिनला पुढील चौकशीसाठी मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हत्येनंतर उल्हासनगर येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना सचिनला कल्याण रेल्वे स्थानकातून या पथकाने गजाआड केले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंकज निकम हा उल्हासनगर-तीन, शांतीनगर, गवबाई पाड्यात त्याच्या कुटुंबियासोबत राहत होता. याच परिसरात सचिन हादेखील राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. २९ डिसेंबरला रात्री उशिरा पंकज अणि सचिन यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात त्याने पंकजवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. गळ्यावर गंभीर दुखापत झाल्याने पंकज हा जागीच कोसळला होता. त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पंकजच्या पत्नीच्या तक्रारीवरुन मध्यवर्ती पोलिसांनी सचिनविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना सचिन हा उल्हासनगर येथून पळून जाण्याच्या तयारीत असून तो कल्याण रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त अमर जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिषठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण खोचरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बबन बांडे, पोलीस हवालदार सकपाळे, पोलीस शिपाई मुत्तलगिरी यांनी कल्याण रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या सचिनला पोलिसांनी शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला मध्यवर्ती पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. हत्येच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.