उल्हासनगरच्या सितारा लॉजिंगमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
थायलंडच्या पंधरा मुलींची सुटका; मॅनेजरसह चौघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑक्टोंबर २०२४
ठाणे, – चांगल्या आर्थिक प्राप्तीचे आमिष दाखवून थायलंड येथून आणलेल्या विदेशी तरुणींच्या मदतीने उल्हासनगरच्या सितारा लॉजिंग ऍण्ड बोर्डिंग हॉटेलमध्ये सुरु असलेल्या एका हायफाय सेक्स रॅकेचा ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरसह चार कर्मचार्यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी पंधरा थाई तरुणीची सुटका केली आहे. मेडीकलनंतर या सर्व तरुणींना महिलासुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या सेक्स रॅकेटची माहिती थायलंडच्या दूतावास अधिकार्यांना देण्यात आली आहे.
उल्हासनगर येथे सितारा लॉजिंग आणि बोर्डिंग नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणी वास्तव्यास असून त्यांच्या मदतीने हॉटेलचे कर्मचारी तिथे सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गंभीर दखल घेत खंडणीविरोधी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, पोलीस हवालदार संजय राठोड, सचिन शिंपी, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, पोलीस नाईक भगवान हिवरे, पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ यांनी मंगळवारी रात्री उशिरा तिथे बोगस ग्राहकाच्या मदतीने साध्या वेशात पाळत ठेवून छापा टाकला होता. यावेळी तिथे विदेशी तरुणींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने हॉटेलचा मॅनेजर कुलदिपक ऊर्फ पंकज जयराम सिंग याच्यासह चार कामगारांना अटक केली. या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी पंधरा थाई बळीत तरुणींची सुटका केली. या सर्वांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. कारवाईदरम्यान हॉटेलमधून पोलिसांनी सुमारे सव्वापाच लाखांची कॅशसहीत मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर सर्व आरोपींना बुधवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या विदेशी मुलींना चांगल्या आर्थिक प्राप्तीचे आमिष दाखवून भारतात आणण्यात आले. त्यांना विदेशात भारतात कोणी आणले, त्याने यापूर्वीही काही विदेशी तरुणींना भारतात आणले आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.