युपीआय अॅपद्वारे 4.64 लाख रुपये ट्रान्स्फर करुन फसवणुक
वयोवृद्धाची फसवणुक केल्याप्रकरणी नातेवाईकाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2025
मुंबई, – मोबाईल फोनचा गैरवापर करुन युपीआय अॅपमधून स्वतच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करुन एका वयोवृद्धाची त्याच्याच नातेवाईकाने फसवणुक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी किरण भरत ढुंगेल या 30 वर्षांच्या आरोपीविरुद्ध कुरार पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. किरण हा तक्रादाराच्या मामेभावाचा मुलगा असून अधूनमधून भेटण्याचा बहाणा करुन त्याने ही ऑनलाईन फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
डौरप्रसाद गौरीकांत उपाध्याय हे 63 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदारमालाड येथील कुरारगाव, कोंकणीपाड्यात राहत असून त्यांचा गॅस वेल्डिंगचे एक दुकान आहे. त्यांना तीन मुले असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विदेशात वास्तव्यास आहेत. ऑक्टोंबर 2024 रोजी त्यांचा मामेभाऊ भरत ढुंगेल हा नेपाळ येथे कायमचा राहण्यासाठी गेला होता. त्याचा मुलगा किरण हा मुंबईत काम करत असल्याने तो अधूनमधून त्यांच्याकडे येत होता. 3 फेब्रुवारीला त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे ते त्यांच्या बँकेत गेले होते. यावेळी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यांच्या बँक खात्यात फक्त पाचशे रुपये शिल्लक असल्याचे समजले होते. त्यांच्या खात्यात किमान चार ते साडेचार लाख शिल्लक होते, असे असताना त्यांच्या खात्यात केवळ पाचशे रुपये शिल्लक असल्याचे समजताच त्यांनी बँक कर्मचार्याकडून त्याच्या खात्याचे स्टेटमेंटची मागणी केली होती. स्टेटमेंट मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या खात्यातून ऑनलाईन युपीआय अॅपने पैसे ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले.
17 ऑक्टोबर 2024 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत किरणने त्यांच्या मोबाईलवरुन ऑनलाईन युपीआयवरुन त्याच्या बँक खात्यात 25 व्यवहार करुन 4 लाख 64 हजार 550 रुपये ट्रान्स्फर केली होती. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी किरणला कॉल केला होता, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी भरत ढुंगेल याला हा प्रकार सांगितला. त्याने तुला जे करायचे आहे ते त्याच्याविषयी मला काहीही सांगू नकोस असे सांगून कॉल बंद केला होता. त्यामुळे त्यांनी कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मामेभावाचा मुलगा किरण ढुंगेल याच्याविरुद्ध त्यांच्या मोाबईल फोनचा वापर करुन त्यामधील युपीआय अॅपमधून पैसे स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन त्यांची 4 लाख 64 हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत किरण ढुंगेलची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.