प्रसुतीसाठी आलेल्या महिलेसह नवजात बाळाच्या मृत्यूने तणाव
व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये संतप्त नातेवाईकांकडून गोंधळ
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सांताक्रुजच्या व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेसह तिच्या नवजात बाळाच्या मृत्यूने हॉस्पिटलमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणला होता. त्यात एका महिला डॉक्टरसह इतरांना किरकोळ दुखापत झाली होती. याप्रकरणी २५ ते ३० जणांविरुद्ध वाकोला पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यात २५ हून अधिक महिलांचा समावेश असून या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नाही. तपास सुरु असून हॉस्पिटलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मेहिका विश्वनाथ शेट्टी या अंधेरीतील सात बंगला परिसरात राहत असून बालरोगतंज्ञ म्हणून व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये काम करतात. गेल्या आठवड्यात अर्चना नावाच्या एका महिलेला प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. ७ नोव्हेंबरला सिझरिंगदरम्यान अर्चनाच्या पोटातील बाळाचा हार्ड रेट कमी होत चालला होता. बाळ जन्माला आले तेव्हापासून त्याचे हार्ड रेट झिरो होता. तो रडत नव्हता. त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले होते. त्याच्यावर डॉ. भावेश, डॉ. जान्हवी शहा, डॉ. श्रीनिवास, डॉक्टर अक्षय आणि त्या स्वत जातीने लक्ष ठेवून देखरेख करत होत्या. हार्ड रेट झिरो असल्याने त्याला व्हेंटीलिटरवर ठेवण्यात आले होते. सिझरिंगसह बाळावर उपचार करताना तिच्या नातेवाईकांनी संमती घेण्यात आली होती. सोमवारी सकाळी बाळासह त्याच्या आईचे उपचारादरम्यान निधन झाले होते. ही माहिती नंतर तिच्या नातेवाईकांना देण्यात आली होती. सर्व फॉर्मलिटी पूर्ण करुन नातेवाईकांनी मृत महिलेसह बाळाचा ताबा घेण्यास नकार दिला.
डॉक्टरांनी उपचारात हलर्जीपणाचा केल्याचा आरोप करुन काही महिलांनी तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्यांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन धक्काबुक्की करु लागले होते. या नातेवाईकांनी तिथे प्रचंड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तेथील वातावरण तंग झाले होते. यावेळी तिथे मेहिका शेट्टी या उपस्थित होत्या. त्यांनी संतप्त झालेल्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कोणाचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या नातेवाईकांनी मेहिका शेट्टी यांच्यासह इतर वैद्यकीय कर्मचार्यांना मारहाण केली होती. जवळपास २५ ते ३० हून अधिक लोकांनी तेथील वैद्यकीय अधिक्षकांना घेराव घालून त्यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. शिवीगाळ करुन त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच ही माहिती वाकोला पोलिसांना देण्यात आली होती.
या माहितीनंतर वाकोला पोलिसांचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. यावेळी पोलिसांनी संतप्त झालेल्या नातेवाईकांची समजूत घालून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मेहिका शेट्टी यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी २५ ते ३० जणांविरुद्ध वैद्यकीय अधिकार्यासह कर्मचार्यांशी हुज्जत घालणे, शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणाखाली असून हॉस्पिटल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.