लग्नाच्या आमिषाने तरुणीची सतरा लाखांची फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांत प्रियकराला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 फेब्रुवारी 2026
मुंबई, – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीची तिच्याच प्रियकराने सुमारे सतरा लाखांची फसवणुक केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पैशांचा अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकर चैतन्य निलेश गावडे याला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. एक कोटीचे काम होणार असल्याची बतावणी करुन चैतन्यने तक्रारदार तरुणीसह तिच्या आईकडून घेतलेल्या पैशांसह स्कूटीचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे.

27 वर्षांची तक्रारदार तरुणी ही तिच्या आईसोबत अंधेरी येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. पूर्वी तिचे कुटुंबिय सांताक्रुज येथे राहत होते. मात्र ही जागा पुर्नविकासासाठी गेल्याने ती तिच्या आईसोबत सांताक्रुज आणि नंतर नवी मुंबईतील पनवेल येथे भाड्याने राहू लागली होती. काही महिन्यांपूर्वी त्या दोघीही अंधेरी येथे शिफ्ट झाले होते. आठ वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले असून त्यांनी त्यांची काही रक्कम एफडी केली होती. ही रक्कम नंतर तिच्या आईच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी तिची चैतन्य गावडेशी ओळख झाली होती. चालक म्हणून काम करणारा चैतन्य हा गोरेगाव येथे राहत होता. या ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते.

अनेकदा तो तिच्या सांताकु्रज आणि पनवेल येथील घरी येत होता. यावेळी त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिनेही त्याला होकार दिला होता. याच दरम्यान त्याने तिच्यासह तिच्या आईचा विश्वास संपादन केला होता. त्याचा पैशांचा एक मोठा व्यवहार होणार असून त्यात त्याला एक कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगितले होते. पैसे येण्यास थोडा वेळ लागत असल्याने त्याने त्यांच्याकडे काही पैसे उसने मागण्यास सुरुवात केली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून तिच्या आईने त्याला मे 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत टप्याटप्याने रोख स्वरुपात 17 लाख 46 हजार 500 रुपये दिले होते. काही दिवसांनी त्याने त्याच्या कामासाठी तिची स्कूटी वापरण्यासाठी घेतली होती. ही स्कूटी नंतर त्याने त्याच्या मित्राला दिली होती.

सप्टेंबर 2024 पासून चैतन्य हा त्याच्या आई-वडिलांसोबत राहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो तिच्या घरी आला नाही. बरेच दिवस तो न आल्याने तिने त्याला कॉल केला होता, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने त्याच्याकडे त्यांच्या पैशांसह स्कूटीची मागणी सुरु केली होती. यावेळी तो विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. अनेकदा तो तिला लग्नाचे आमिष दाखवून पैशांचा विषय टाळण्याचा प्रयत्न करत होता. एक कोटीच्या कामासह लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यासह तिच्या आईची आर्थिक फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी चैतन्य गावडे याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी प्रियकर चैतन्य गावडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page